या दिवशी भारतात रिलीज होणार ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस-९’


‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ हॉलीवूडमधील अतिशय लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असून भारतात हा चित्रपट सर्वाधिक पाहिला जाणार हॉलीवूड चित्रपट आहे. याचे एकूण आठ भाग रिलीज झाले असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस नववा भाग येत आहे. येत्या गुरुवारी हा चित्रपट अमेरिका आणि कॅनडामध्ये रिलीज होणार आहे.

२०१९ मध्येच ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ च्या नवव्या सिक्वलचा ट्रेलर रिलीज झाला होता आणि १८ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट रिलीज होणार होता. पण कोरोनाच्या संकटामुळे ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस-९’ ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. हा चित्रपट इंग्रजीसोबतच हिंदी, तामिळ आणि तेलगू या भाषांमध्ये देखील रिलीज होणार असून आता निर्मात्यांनी *या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.

‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ हा एक अ‍ॅक्शनपट चित्रपटांची मालिका आहे. या चित्रपटातील कलाकार वेगवान गाड्यांचा वापर करुन कोट्यवधींच्या चोऱ्या करतात. यावेळी पोलीस आणि चोरांमध्ये रंगलेला लपंडाव या चित्रपटांमध्ये दाखवला जातो. जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स, फाईट आणि वेगवान गाड्यांच्या स्टंटबाजीमुळे ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ ही चित्रपट मालिका भारतात प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेचा नववा भाग ‘५ ऑगस्ट’ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाला आहे.

दरम्यान ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’मध्ये आपण आतापर्यंत ड्वेन जॉन्सन, पॉल वॉकर, जेसन स्टॅथम यांसारख्या अनेक कलाकारांना स्टंटबाजी करताना पाहिले आहे. यावेळी अ‍ॅक्शनस्टार विन डिझलबरोबर मिशेल रोड्रिग्ज WWE सुपरस्टार जॉन सिना देखील अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाल्यापासून अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. तर आता प्रेक्षक ५ ऑगस्टची आतूरतेने वाट पाहत आहेत.