आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनखाली दिसल्या १० युएफओ

एलियन्स आणि उडत्या तबकड्या यांच्या विषयी पुन्हा नव्याने एक दावा केला गेला असून त्यामुळे एलियन्स आणि युएफओ पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या खालच्या भागात एकच वेळी १० छोट्या काळ्या वस्तू उडताना टिपल्या गेल्या असून त्या युएफओ असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नासाच्या लाईव्ह फीड मध्ये दक्षिण अटलांटिक समुद्रात एका सर्कल मध्ये या १० अज्ञात वस्तू दिसल्या आहेत.

द सनच्या रिपोर्टनुसार युएफओ हंटर मि. एमबीबी ३३३ ने स्पेस वॉचर द्वारा ३ जुलै रोजी घेतलेला स्क्रीन शॉट शेअर केला आहे. त्यात आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनच्या खाली काळ्या रंगाच्या छोट्या वस्तू दिसत आहेत. या संदर्भात लिहिलेल्या पोस्ट मध्ये युएफओ हंटर म्हणतो, ‘किमान १० अज्ञात वस्तू.’ या नंतर सोशल मीडियावर एलियन्स आणि उडत्या तबकड्या यांच्या चर्चेला जोर आला आहे. एलियन्स अस्तित्वात आहेत का याविषयी विविध दावे केले जात आहेत.

अमेरिकन सरकारने युएफओ बाबत पूर्वी जाहीर केलेल्या अहवालात युएफओ विषयीचा दावा पूर्णपणे फेटाळलेला नाही मात्र त्याबाबत अधिक तपास आवश्यक असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेत आत्तापर्यंत युएफओ दिसल्याच्या १४४ घटना नोंदविल्या गेल्या आहेत.