आदित्य ठाकरेंबाबत नितेश राणेंनी केले चुकीचे वक्तव्य; मागे घेतले आपले शब्द


मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर टीका करताना पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल बोलताना चुकीचे वक्तव्य केले होते. नितेश राणेंनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत ट्विट करून खुलासा केला आहे. आज ट्वीट करून नितेश राणे यांनी आपले शब्द मागे घेतले आहेत.

नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी जोरदार राडा केल्यानंतर नितेश राणे यांच्याकडून भावना दुखावल्या असल्यास मी माझे शब्द मागे घेतो, असे ट्विट करण्यात आले आहे. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 राडेबाज आमदारांवर निलंबनाची कारवाई केली.

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी विधान भवनाच्या पायऱ्यांवर प्रति विधानसभा भरवली होती. यामध्ये भाग घेताना अनेक आमदारांनी सरकारवर टीका केली. शिवसेना व मुख्यमंत्र्यांना सातत्याने लक्ष्य करणाऱ्या नितेश राणे यांनाही प्रति विधानसभेत बोलण्याची संधी मिळाली. त्यावेळी नितेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. त्यावेळी बोलताना नितेश राणेंचा तोल गेला.


आदित्य ठाकरे हे ठाकरे यांचे वंशज आहेत का? त्यांची डीएनए टेस्ट करावी लागेल, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे आज तीव्र पडसाद उमटले. मुंबईत शिवसैनिकांनी रस्त्यावर येत नितेश राणे यांचा पुतळा जाळला व माफीची मागणी केली. भविष्यात तोंड सांभाळून बोलावे, असा इशाराही दिला.

हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन नितेश राणे यांनी ट्वीट करत आपले शब्द मागे घेतले आहेत. विधान भवनाबाहेर काल भाषण करताना मी आदित्य ठाकरे यांच्याबद्दल जे बोललो, त्याबाबत अनेकांचा गैरसमज झाला आहे. माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्यास माझे शब्द मागे घेतो. वैयक्तिक टीका करण्याचा माझा हेतू नव्हता, असे नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.