दिलीप कुमार यांना मुंबई पोलिसांची अनोखी श्रद्धांजली


मुंबई – ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे आज निधन झाल्यामुळे अवघ्या बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे हिंदुजा रुग्णालयात दाखल असलेल्या दिलीप कुमार यांनी बुधवारी सकाळी ७.३० वाजता अखेरचा श्वास घेतला, दिलीप कुमार यांचे निधन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अमिताभ बच्चन यांच्यापर्यंत प्रत्येकजण सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहे. मुंबई पोलिसांनीही नेहमीप्रमाणे वेगळ्या शैलीत ट्वीट करत दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली असून हे ट्वीट सध्या व्हायरल होत आहे.


दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहताना मुंबई पोलिसांनी त्यांच्या चित्रपटाच्या नावांचा वापर केला आहे. दिलीप साहेब आम्ही आमच्या ‘कर्मा’शी सच्चे राहू आणि आपली सर्व ‘शक्ती’ कायद्याची (कानून) ‘मशाल’ पेटती ठेवण्यात गुंतवू. ‘कर्मा’, ‘शक्ती’, ‘कानून’ आणि ‘मशाल’ हे दिलीप कुमार यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी आहेत. या चित्रपटातील त्यांच्या जबरदस्त भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.