अधिवेशनातील राड्यानंतर गृह खात्याने वाढवली भास्कर जाधव यांची सुरक्षा


मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशातील पहिल्या दिवशी सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये जोरदार राडा पाहायला मिळाला. त्याचबरोबर तालिका अध्यक्षांच्या दालनात आपल्याला धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला होता. त्यानंतर अखेर जाधव यांना दोन सुरक्षारक्षक देण्यात आले आहेत. अधिवेशनात झालेल्या गोंधळानंतर महाविकास आघाडीनं जाधव यांना सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.

भास्कर जाधव यांनी विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजवले. भाजप नेते सरकारला ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण, कोरोना, शेतकरी, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप अशा अनेक मुद्द्यांवरुन धारेवर धरणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. सुरुवातीचा काही काळ तसे चित्रही पाहायला मिळाले. पण जेव्हा भास्कर जाधव तालिका अध्यक्ष म्हणून बसले, त्यावेळी सभागृहातील चित्रच पालटले. तालिका अध्यक्ष म्हणून जाधव यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. जाधव यांच्या सभागृहातील पवित्र्यामुळे त्यांना सोशल मीडियातून धमक्या येत असल्याचा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यानंतर गृह खात्याने भास्कर जाधव यांना दोन सुरक्षा रक्षकांकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत असताना विरोधकांनी त्यांना मध्येच टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलत होते. आता ते आत जात आहेत, अशी धमकीच सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घातला. तर, विधानसभा अध्यक्षांनी हे वाक्य कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मुनगंटीवार यांच्या या विधानाला जोरदार आक्षेप घेतला. मुनगंटीवार सभागृहात धमकी देत आहे का?, असा सवाल पटोले यांनी केला. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी हे विधान कामकाजातून वगळण्यास सांगितले. भास्कर जाधव यांनी त्याला विरोध केला. मला सुधीर मुनगंटीवार यांनी धमकी दिली आहे. हे कामकाजातून काढून टाकू नका. कामकाजात हे वाक्य ठेवा. ते काढून टाकू नका. मुनगंटीवार यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. ते रेकॉर्डवरच ठेवा. यांच्या राज्यात सध्या तेच चालू आहे. ईडी, सीबीआय, एसआयटी लावली जात आहे. त्यामुळे त्यांचे विधान रेकॉर्डवरून काढू नका, असे जाधव म्हणाले.