आणि माझे नाव ठेवले अमजद खान; नाना पटोलेंचे गंभीर आरोप


मुंबई : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरला. फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी गाजला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केले आहेत. माझा फोन 2016-17मध्ये टॅप करण्यात आला होता आणि माझ्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आल्याचा गंभीर आरोप नाना पटोलेंनी सभागृहात केला आहे.

‘अमजद खान’ नावाने माझा फोन नंबर टॅप करण्यात आला. हे फोन टॅपिंग कोणाच्या आदेशावरून करण्यात आले? यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली. माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा असल्याचेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

मुस्लिम धर्माचे नाव फोन टॅप करण्यासाठी देण्यात आले. या पद्धतीने हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करुन धर्माच्या नावाने पुन्हा राजकारण करण्याचा उद्देश या मागे होता का? फोन टॅपिंगमागचा मुख्य सूत्रधार शोधून काढा असे सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केले.

भास्कर जाधव यांना काल सभागृहात धमकी देण्यात आली की तुम्ही बोललात तर तुमचाही अनिल देशमुख करून टाकू. बाहेर सांगतात भुजबळ करून टाकू. अशी धमकी या सभागृहात कशी दिली जाते? हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे नाना पटोले म्हणाले.

भाजप सरकारच्या काळात झालेले फोन टॅपिंगचे प्रकरण आता भाजपला भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. दुसऱ्यांचे नाव देऊन फोन टॅप केला, असेल तर ते गंभीर आहे, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, असे आश्वासन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. तसेच आगामी अधिवेशनापर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.