भुतासह राहण्याची तयारी असल्यास फ्लॅटच्या किंमतीत हे अख्खे गाव खरेदीची संधी

निसर्गसुंदर स्कॉटलंड मध्ये एक प्राचीन स्कॉटिश गाव विक्रीसाठी उपलब्ध आहे. या गावात कुणी राहत नाही. मात्र १ लाख ७३ हजार डॉलर्स म्हणजे साधारण सव्वा कोटी रुपयात हे अख्खे गाव खरेदी करता येणार आहे. स्कॉटलंडमधील अनेक शहरात एका फ्लॅटसाठी सुद्धा इतकी किंमत मोजावी लागते. पण त्याच किमतीत हे सगळे गाव विकत मिळणार आहे.

ओल्ड विलेज ऑफ लोर्स पर्थशायर असे या गावाचे नाव असून त्याचे क्षेत्रफळ साधारण साडेतीन एकर आहे. उंच डोंगर, खासगी बीच, मासे शिकार परवानगी सह हे गाव विक्रीसाठी आहे. १७ व्या शतकातले हे गाव आता ओसाड आहे. येथे हाउस ऑफ लोयार्स अशी एक जागा आहे आणि ही जागा म्हणजे लेडी ऑफ लोयार्सचे घर होते. तिने त्याकाळात वर्तविलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या होत्या असे सांगतात. या गावात या लेडीचा आत्मा वावरतो असा समज आहे.

१८४१ च्या जनगणनेनुसार त्या काळात येथे १७ नागरिक राहत होते. १८९१ मध्ये येथे ७ नागरिक होते. १९२६ पासून ज्या घरात हे लोक राहत होते ते ओसाड आहे. २०१६ मध्ये हे गाव १ लाख पौंडात विकले गेले होते. आता ते परत विक्रीसाठी आले आहे. गोल्डक्रॉस लँड अँड फॉरेस्ट्री तर्फे या गावाची विक्री केली जात आहे.