रणवीर सिंह होस्ट करत असलेल्या शोचा समोर आला हटके प्रोमो


बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह मोठ्या पडद्यावरील यशानंतर आता छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. होय, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान सारख्या स्टार्सनंतर बॉलिवूडचा ‘गल्ली बॉय’ आता छोट्या पडद्यावर आपले नशीब आजमावू पाहत आहे. तो एका टीव्हीशो द्वारे लोकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. रणवीर छोट्या पडद्यावर ‘द बिग पिक्चर’ नावाचा क्विझ शो घेऊन येत आहे. कलर्स टीव्हीवर रणवीरचा हा नवीन शो येणार असून या शोचा पहिला प्रोमो रिलीज करण्यात आला आहे. या शोची निर्मिती बानीजय एशिया आणि आयटीव्ही स्टुडिओ ग्लोबल एंटरटेनमेंट बी व्ही यांची आहे.


शनिवारी कलर्स वाहिनीने एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे ‘द बिग पिक्चर’चा प्रोमो शेअर केला आहे. शोच्या या पहिल्या प्रोमोवरून स्पष्ट झाले आहे की रणवीरचा हा गेम शो चित्रांवर आधारित असेल. मात्र, या शोची नक्की संकल्पना काय आहे हे लवकरच स्पष्ट होईल. शोच्या प्रोमोमध्ये रणवीर असे म्हणताना दिसत आहे की- तस्वीरों में मिलेंगे सवाल और जवाब में मिलेंगे करोड़ों आ रहे हैं रणवीर सिंह तस्वीर से आपकी तकदीर बदलने.

हा नवीन शो एक क्विझ शो असून, यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या ज्ञान आणि मेमरीची चाचणी घेतली जाणार आहे. स्पर्धकांना व्हिज्युअलवर आधारित 12 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. शोमध्ये तीन लाइफलाइन देखील आहेत. आपल्या टीव्हीवरील पदार्पणाबद्दल रणवीर सिंहने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, एक कलाकार म्हणून माझ्या प्रवासात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करण्याची आणि एक्सप्लोर करण्याची इच्छा होती. म्हणूनच आता मी टीव्हीद्वारे लोकांचे मनोरंजन करणार आहे. भारतीय सिनेसृष्टीने मला खरोखर खूप काही दिले आहे, ज्याचा मी नेहमीच आभारी असेन.