नवी दिल्लीः कोविन प्लॅटफॉर्म म्हणजे कोरोना विरोधातील लढाईत दोन हात करण्यासाठी भारताने जगाला प्रदान केलेली सार्वजनिक डिजिटल सामग्री असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे. कोविन जागतिक परिषदेला पंतप्रधान मोदींनी संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.
नरेंद्र मोदींची घोषणा; कोविनची सुविधा सर्व देशांना उपलब्ध होणार
पंतप्रधान मोदींनी यावेळी कोरोनामुळे जीव गमावलेल्या देशातील सर्व नागरिकांना आदरांजली वाहिली. अशी महामारी गेल्या शंभर वर्षात जगाने पाहिली नाही आणि अशा आव्हानाचा सामना शक्तिशाली देशांनाही एकट्याने करता येणे अशक्य होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या महामारीने माणुसकी आणि माणसाच्या भल्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करायला आणि मिळून पुढे जायला हवे हा मोठा धडा शिकवला आहे. एकमेकांकडून शिकणे तसेच आपल्याला सापडलेली योग्य दिशा दुसऱ्याला दाखवणे अशा स्थितीत आपल्याला भाग असल्याचेही पंतप्रधान म्हणाले.
भारत हा अनुभव, कौशल्य आणि संसाधने यांचे जागतिक पातळीवर सामायिकीकरण करण्याप्रती कटिबद्ध आहे. कोरोना महामारीशी लढताना तंत्रज्ञानाची मदत महत्वाची आहे. सॉफ्टवेअर हे असे क्षेत्र आहे, जिथे संसाधनांची कमतरता नाही. म्हणूनच, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पूर्ण शक्य झाल्याबरोबर भारताने आपले कोरोना ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग म्हणजेच संसर्गाचा माग काढणारे आणि संसर्ग शोधणारे तंत्रज्ञान ओपन सोर्स केल्याचे पंतप्रधान म्हणाले.
डेव्हलपर्ससाठी २०० दशलक्ष वापरकर्ते असणारे आरोग्यसेतु हे अॅप सहजगत्या उपलब्ध असल्याचे सांगितले. भारतात वापर होत असल्यामुळे त्याचा वेग आणि दर्जा याबाबतची चाचणी प्रत्यक्ष झाल्याचे सांगत पंतप्रधान मोदींनी जगाला आश्वस्त केले. त्याचबरोबर भारताने लसीकरणाला महत्त्व देत नियोजनात पूर्णपणे डिजिटल दृष्टीकोन स्वीकारण्याचा निर्णय घेतला. यामुळे लसीकरण झाल्याचे सिद्ध करण्याच्या दृष्टीने लोकांची सोय झाली आणि कोरोनानंतर ग्लोबल जगात सहजता येईल. हा सुरक्षित, रक्षण करणारा आणि विश्वासपात्र पुरावा वापरून नागरिकांना आपले लसीकरण केव्हा कसे आणि कोणाकडून झाले हे खात्रीशीरपणे सांगता येईल. लसींच्या वापराचा माग आणि कमीत कमी नुकसान यासाठी डिजिटल दृष्टीकोन मदत करतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
संपूर्ण जग एक असल्याच्या भारतीय तत्वज्ञानाला अनुसरुन कोविन मंच ओपन सोर्स ठेवला आहे आणि लवकरच ते कोणत्याही तसेच सर्व देशांमध्ये उपलब्ध होईल, असेही ते म्हणाले. आजची परिषद ही, या मंचाची जागतिक व्यासपीठावरून ओळख करून देण्यासाठीचे पहिले पाऊल आहे.
कोविनमार्फत काही दिवसांपूर्वीच एका दिवसात ९० लाखाहून अधिक लोकांना आणि याप्रकारे आतापर्यंत ३५ कोटींहून नागरिकांचे लसीकरण झाले आहे. याशिवाय लसीकरणाचा पुरावा म्हणून कोणताही नाशिवंत कागद जवळ बाळगण्याची गरज नाही, तर तो डिजिटल प्रकारे तयार होतो. कोविनसाठी इच्छुक असणाऱ्या देशांना आवश्यक असणारे बदल कोविनमध्ये करता येतील, अशी ग्वाही पंतप्रधान मोदींनी यावेळी दिली. आपण एक पृथ्वी एक आरोग्य या दृष्टीकोनातून मार्गक्रमण केल्यास माणुसकी नक्कीच महामारीवर मात करेल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.