इतिहास बनू नका, तर इतिहास घडवा म्हणजे येथे तैमूर, औरंगजेब, बाबर, हुमायून जन्माला येणार नाहीत – सूरज पाल अमू


हरयाणा – भाजप हरयाणाचे प्रवक्ते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सूरज पाल अमू यांनी इतिहास बनू नका, तर इतिहास घडवा म्हणजे इथे तैमूर, औरंगजेब, बाबर, हुमायून जन्माला येणार नाहीत, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. रविवारी गुरगावमध्ये महापंचायत पार पडली. लव्ह जिहाद, धर्मांतर आणि लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर या पंचायतीत चर्चा झाली. त्यांनी यावेळी पाकिस्तानी नागरिकांना घरे भाड्याने देऊ नका, तर त्यांना भारतातून हाकलण्याचा प्रस्ताव मंजूर करावा, असे वक्तव्यही केले.

रविवारी गुरगावमध्ये महापंचायत पार पडली. भाजपचे प्रवक्ते आणि करणी सेनेचे अध्यक्ष सूरजपाल अमू यांनी या महापंचायतीत वादग्रस्त वक्तव्ये केली. ते म्हणाले, भारत जर आपली माता आहे, तर पाकिस्तानचे आपण बाप आहोत आणि या पाकिस्तानींना आपण येथे घरे भाड्याने देणार नाही. त्यांना देशातून हाकला, तसा प्रस्ताव मंजूर करा, असे ते म्हणाले.

देशाची १९४७ मध्ये फाळणी झाली. आपण १० लाख लोकांचे मृतदेह बघितले. त्या मृतदेहांची आतापर्यंत कुठेच माहिती नाही आणि आपण त्यांना घरे भाड्याने देत आहोत. एवढेच नव्हे तर पतौडीमध्ये त्यांचे पार्क उभारले जात आहेत. उभारण्यात येणाऱ्या पार्कचे दगड उखडून फेका… हे दगड काढून फेकण्यासाठी कोणते युवक तयार आहेत?, असे सूरज पाल अमू म्हणाले.

उज्जिना येथील सूरज पाल सिंह यांची मला आठवण येत आहे, ज्यांनी आपल्या गावात मशीद उभारू दिली नाही. एक तरुण मला सांगत होता की, भोडकलानमध्ये पुन्हा पुन्हा मशीद उभारण्यात येत आहे. ते हे थांबवतात. पण पुन्हा मशीद उभारली जाते. हे मूळापासूनच उखडून फेका, असं भडकाऊ वक्तव्य सूरज पाल अमू यांनी महापंचायतीत बोलताना केले. देशात जर इतिहास घडवायची इच्छा असेल, तर इतिहास बनायचे नाही; इतिहास बनवायचा आहे. मग ना तैमूर जन्माला येईल, ना औरंगजेब, बाबर, हुमायून जन्माला येईल. आपण शंभर कोटी आहोत आणि ते २० कोटी, असे वक्तव्यही सूरज पाल अमू यांनी या पंचायतीत केले.

२०१७ मध्ये पद्मावत चित्रपटावरून निर्माण झालेल्या वादामुळे करणी सेनेचे अध्यक्ष असलेले सूरज पाल अमू चर्चेत आले होते. चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा शिरच्छेद करणाऱ्याला दहा १० कोटी रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा सूरज पाल अमू यांनी केली होती. त्यावरून ते वादातही सापडले होते.