भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्याकडून उद्धव ठाकरेंवर टीका करत राहुल गांधींचे कौतुक


मुंबई – आजपासून राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी आणि विरोधकांच्या बैठकांमध्ये रणनीती निश्चित करण्यात आली. दोन दिवसांचेच अधिवेशन असल्यामुळे विरोधकांबरोबर होणारा चहापानाचा कार्यक्रम यंदा रद्द करण्यात आला होता. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषददेखील रद्द केल्यामुळे विरोधकांनी निशाणा साधला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा राहुल गांधी बरे अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

विधीमंडळ अधिवेशनापूर्वी पत्रकारांना संबोधित करण्याचे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना झालेले नाही. १७० आमदार पाठीशी असून एवढेही बळ नसेल तर उपयोग काय? त्यांच्यापेक्षा राहुल गांधी बरे….” असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.

आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांबद्दल नापसंती, इतर मागासवर्गीय समाजाची (ओबीसी) सांख्यिकी माहिती मिळावी आणि मराठा आरक्षणासाठी घटनात्मक प्रक्रिया पार पाडावी, यासाठी ठराव मांडून केंद्रातील भाजप सरकारविरोधात भूमिका घेणार आहे. दुसरीकडे, काँग्रेसने आग्रही मागणी करूनही या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षांची निवड होणार नसल्याचे स्पष्ट झाले.


तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे कथित भ्रष्टाचार, मराठा आणि ओबीसींचे आरक्षण, लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थीची होणारी कोंडी आदी विषयांवर जाब विचारणार असल्याचे जाहीर केले. विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाईल या भीतीनेच सत्ताधाऱ्यांनी केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेतल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभा अध्यक्षांविना होणारे राज्य विधिमंडळाच्या इतिहासातील हे तिसरे अधिवेशन असेल. १९८० मध्ये शिवराज पाटील यांच्या राजीनाम्यानंतर हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना पार पडले होते. नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर चालू वर्षांत मार्चमध्ये झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशनही अध्यक्षांविना पार पडले होते. यापाठोपाठ पावसाळी अधिवेशनही उपाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडेल.