ऑकलंड प्राणीसंग्रहालयात प्राण्यांचे करोना लसीकरण सुरु

करोना पासून संरक्षणासाठी माणसांचे लसीकरण केले जात आहे त्याचप्रमाणे अनेक देशात प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांना करोना पासून संरक्षण मिळावे म्हणून त्यांचेही लसीकरण सुरु झाले आहे. अमेरिकेच्या ऑकलंड झु मध्ये प्रायोगिक तत्वावर दोन वाघ, अस्वल आणि उदमांजर यांना करोना लस दिली गेली आहे. या प्राण्यांमध्ये करोनाची लक्षणे नव्हती तरीही सुरक्षेचा उपाय म्हणून ही लस दिली गेली. ही लस न्यूजर्सीच्या झोयेरीस कंपनीने डेव्हलप केली आहे. ही लस खास प्राण्यांसाठी तयार केली गेली आहे.

झु व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात वाघ, अस्वले, पहाडी सिंग, उदमांजरे यांना लस दिली जाणार असून त्यानंतर सस्तन प्राणी आणि डुकरांना लस दिली जाणार आहे. झु मध्ये जनावरांमध्ये सोशल डीस्टन्सिंग राहावे म्हणून बॅरीअर्स घातले गेले आहेत. देखरेख करणारे कर्मचारी पीपीई किट घालूनच वावरत आहेत. यामध्ये माणसांकडून प्राण्यांमध्ये संक्रमण पसरू नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे.

झोएटीस कंपनीने २७ राज्यातील ७० हून अधिक प्राणी संग्रहालयांना ११००० डोस दान दिले आहेत. जगात आत्तापर्यंत गोरीला, वाघ, पाळीव मांजरे, पाळीव कुत्री, सिंह या प्राण्यात करोना संक्रमण दिसून आले आहे. रशियानेही प्राण्यांना लस देण्याची योजना राबविली असून तेथे सर्वप्रथम लष्करातील घोड्यांना करोना लस दिली जात आहे.