ही आहेत जगातील सर्वात अजब रेस्टॉरंट्स


आजच्या काळामध्ये रेस्टॉरंट्स मध्ये जाऊन भोजन घेण्याची पद्धत आपल्या सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. निमित्त गेट टुगेदरचे असो, किंवा बऱ्याच दिवसांपासून जमू पाहणारा गप्पांचा अड्डा असो, काही समारंभाच्या निमित्ताने भेटणे असो, किंवा अगदी घरी जेवण्याचा कंटाळा आला असो, एखाद्या फक्कडशा रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी आजकाल आपल्याला कोणतेही निमित्त पुरत असते. मात्र एखाद्या रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठी गेले असताना जर एकदम गुडूप अंधार असलेल्या एखाद्या रूममध्ये तुम्हाला बसविले, किंवा तुमच्या पुढले टेबल थंडगार बर्फाचे बनलेले असले, तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? जगामध्ये अशी काही अजब रेस्टॉरंट्स आहेत, ज्या ठिकाणी असे अनुभव तुम्हाला घेता येतील.

निसर्गाच्या सान्निद्ध्यात चविष्ट भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी इंग्लंडमधील क्र्यूकर्न येथे असलेले ‘द यर्ट’ (The Yurt) हे रेस्टॉरंट अतिशय लोकप्रिय आहे. या रेस्टॉरंटपर्यंत पोहोचण्यासाठी गर्द वनराईमधून वाट काढत पोहोचावे लागते. येथे पोहोचल्यानंतर ग्राहकांच्या पसंतीप्रमाणे येथील खानसामे ताजे भोजन अल्प वेळामध्ये तयार करून ग्राहकांना सर्व्ह करतात. या ठिकाणी राहण्याची व्यवस्था देखील असून, चार कॉटेजेस (yurts) ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. हे रेस्टॉरंट एका मोठ्या organic फार्मचाच एक भाग आहे. या रेस्टॉरंटमध्ये एका वेळी चोवीस लोकांना भोजन करता येते.

चीनमधील ‘अल्ट्रा व्हायोलेट’ हे रेस्टॉरंट शांघाईमधील एका गुप्त ठिकाणी अस्तित्वात आहे. म्हणजेच हे रेस्टॉरंट नेमके कोणत्या इमारतीमध्ये आहे याचा पत्ता कोणालाही नाही. या रेस्टॉरंटमध्ये दररोज दहा व्यक्तींसाठी अनेक ‘कोर्स’ मेन्यू असतो. या रेस्टॉरंटमध्ये भोजन घेण्यासाठी जायचे असल्यास त्याचे बुकिंग ऑनलाईन करावे लागत असून, ज्यांचे बुकिंग ‘कन्फर्म’ झाले असेल अशा ग्राहकांना एका विवक्षित ठिकाणी एकत्र होण्याची सूचना देण्यात येते. त्यानंतर एका गाडीमधून या सर्व ग्राहकांना रेस्टॉरंटमध्ये नेण्यात येते. रेस्टॉरंटकडे नेण्यात येत असताना आपण कोणत्या मार्गाने चाललो आहोत, किंवा कोणत्या इमारतीमध्ये प्रवेश करीत आहोत हे ग्राहकांना समजणार नाही याची पूर्ण खबरदारी घेतली जाते. या रेस्टॉरंटच्या डायनिंग हॉलमध्ये कोणत्याही प्रकारची सजावट नाही. येथे भोजन घेण्यास येण्यासाठी ग्राहकांना चार महिने आधीपासूनच जागा आरक्षित कराव्या लागतात.

‘डार्क डायनिंग’, म्हणजेच एकदम अंधाऱ्या किंवा अतिशय अंधुक प्रकाश असलेल्या रेस्टॉरंट्सची ट्रेंड वास्तविक युरोपमध्ये सुरु झाली. पण येथूनच ‘ओपेक’ हे डार्क डायनिंग रेस्टॉरंट आता अमेरिकेमध्येही सुरु झाले असून, या रेस्टॉरंटमध्ये अतिशय अंधुक प्रकाशात ग्राहकांना भोजन घ्यावे लागते. या रेस्टॉरंटमधील काही वस्तू अंधुक प्रकाशाने ‘हायलाईट’ करण्यात आल्या असून, या अशा गोष्टी आहेत ज्या सर्वसामान्य रेस्टॉरंटमध्ये असतात, पण त्या वस्तूंकडे सहसा आपले लक्ष जात नाही. या वस्तूंकडे लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी या वस्तूंवर केंद्रित मंद प्रकाशझोत सोडले, तर बाकी या रेस्टॉरंटमध्ये संपूर्ण अंधारच असून, या अंधारातच ग्राहकांना आपले भोजन घ्यावे लागते.

दुबईतील ‘चिल आउट’ लाउंज हे एक हटके रेस्टॉरंट असून, या रेस्टॉरंटमध्ये फर्निचरपासून रेस्टॉरंटच्या सजावटीच्या वस्तूंपर्यंत सर्व काही बर्फाचे बनलेले आहे. येथे ग्राहकांना बसून भोजन घेण्यासाठी टेबले आणि खुर्च्यादेखील बर्फाच्या आहेत. खुर्च्यांवर बसण्यासाठी अक्रेलिक पॅड्स लावण्यात आली असून, ज्यांना जास्त थंडी सहन होत नसेल त्या ग्राहकांसाठी उबदार फर कोट्स देखील रेस्टॉरंटच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत असतात.

Leave a Comment