फेशियल करविताना अशी घ्या काळजी


आपल्या चेहऱ्याची काळजी घेताना आपला चेहरा नेहमी सुंदर आणि त्वचा नितळ, चमकदार रहावी अशी इच्छा केवळ स्त्रियांनाच नाही, तर पुरुषांनाही असते. त्यामुळे ‘फेशियल’, किंवा फेशियल क्लीनअप व मसाज ही थेरपी लोकप्रिय आहे. चेहऱ्याचे सौंदर्य वाढविण्याबरोबरच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करीत त्वचेवरील मृत पेशी, ब्लॅक हेड्स आणि व्हाईट हेड्स नाहीसे करण्याचे काम फेशियल थेरपी करीत असते. मात्र ही थेरपी घेताना योग्य काळजी घेतली गेली नाही, तर चेहऱ्याला नुकसान होण्याची शक्यताच अधिक असते. त्यामुळे फेशियल थेरपी निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

काही लोकांची त्वचा तेलकट असते. अशा व्यक्तींना चेहऱ्यावर मुरुमे अधिक येत असतात. अशा व्यक्तींच्या फेशियल थेरपी साठी तेलयुक्त क्रीम्स वापरली गेली, तर त्वचा अधिक तेलकट होऊन मुरुमे वाढू शकतात. तेलयुक्त क्रीम्स वापरली गेल्याने त्वचेवरील रंध्रे बंद होऊन पिंपल्स येण्याचे प्रमाण वाढू शकते. तेलकट त्वचा असणाऱ्या व्यक्तींनी फेशियलसाठी वॉटर बेस्ड क्रीम्सचा वापर करणे चांगले. फेशियल थेरपी साठी वापरण्यात येणारे प्रोडक्ट आपल्या नेहमीच्या वापरातील नसून, नवे असल्यास त्याची ‘पॅच टेस्ट’ करून पाहणे चांगले. या टेस्टद्वारे आपण वापरणार असलेल्या क्रीमचे कोणत्याही प्रकारचे दुष्परिणाम आपल्या त्वचेवर होणार नाहीत याची खात्री आपल्याला करून घेता येते. ही टेस्ट करण्यासाठी थोडेसे क्रीम आपल्या मनगटाच्या आतील बाजूस लावून पाहावे. चोवीस तासांच्या नंतर या क्रीमचा कोणताही दुष्परिणाम जाणविला नाही, तरच हे क्रीम चेहऱ्यावर लावण्यास योग्य आहे असे समजून त्याचा फेशियल थेरपी साठी वापर करावा.

फेशियल थेरपी एखाद्या ब्युटी सॅलोनमध्ये किंवा पार्लरमध्ये जाऊन करविणार असल्यास तेथील स्वच्छता, फेशियलच्या दरम्यान वापरण्यात येणारे टॉवेल, नॅपकिन, स्टीमर आणि इतर उपकरणे स्वच्छ असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. जर या वस्तू स्वच्छ आणि निर्जंतुक केलेल्या नसतील तर त्याद्वारे त्वचेला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. तसेच फेशियल करविताना आपल्यासाठी वापरण्यात येणारी फेशियल कीट संपूर्णपणे नवी, आणि आधीपासून वापरलेली नाही याची खात्री करून घ्यावी. आजकाल फेशियल कीटमध्ये सर्व प्रसाधने लहान लहान पाऊचेसमध्ये उपलब्ध असल्याने प्रोडक्ट आधी वापरले गेले आहे किंवा नाही याची सहज खात्री करून घेता येते.

फेशियलसाठी वापरण्यात येणाऱ्या अनेक प्रसाधानांमध्ये किंवा क्रीम्समध्ये अनेक प्रकारची रसायने असतात. या रसायनांच्या मुळे त्वचा कोरडी होणे, त्वचेला खाज सुटणे, त्वच लालसर होणे अश्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे फेशियलसाठी शक्यतो संपूर्णपणे नैसर्गिक वस्तूंचा वापर करणे केव्हाही चांगले. फेशियल थेरपी केल्यानंतर उन्हामध्ये बाहेर पडणे, किंवा साबणाचा वापर टाळावा. फेशियल थेरपीनंतर त्वरित सौंदर्यप्रसाधनांचा वापरही करू नये. फेशियल केल्यानंतर त्वचेची रंध्रे खुली असतात. त्यामुळे सौंदर्य प्रसाधानांमधील रसायने या रंध्रांच्या वाटे त्वचेच्या आत शिरून त्वचेचे नुकसान करू शकतात. फेशियल नंतर चेहरा धुण्यासाठी साबण किंवा फेसवॉशचा वापर न करता केवळ थंड पाण्याने चेहरा धुवावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment