‘ब्राईडग्रूम्स ओक’ -लगीनगाठी जुळविणारे झाड !


उत्तर जर्मनीमध्ये बाल्टिक सागराच्या जवळ, युटीन नामक एक लहानसे गाव आहे. या गावामध्ये असलेल्या एका लहानशा हवेलीच्या पुढे जाणारी वाट एका घनदाट अरण्यात शिरते. या अरण्यामध्ये शिरल्यानंतर काही अंतरावर एक फाटक आहे. दररोज येथे येणारा मार्टेन्स नामक पोस्टमन आपल्या जवळील किल्लीने हे फाटक उघडतो आणि आत शिरतो. आतमध्ये एक भला मोठा ओक वृक्ष आहे. आपल्याकडील पत्रे पोस्टमन या भल्या मोठ्या वृक्षाच्या ढोलीमध्ये ठेवतो. ही सर्व पत्रे खास या झाडालाच लिहिलेली असतात. रोजच्या प्रमाणे ही सर्व पत्रे झाडापर्यंत पोहोचविण्याची कामगिरी पोस्टमन पार पडतो आणि निघूनही जातो. ही कुठलीही कथा नाही, तर ही घटना सांगितल्या प्रमाणे आजही, अगदी दररोज घडत असते. केवळ या गावातच काय, तर बहुधा सर्व जगामध्ये खास स्वतःचा पत्ता असलेला आणि त्याला नेमाने हजारो पत्र लिहिली जात असलेला हा एकमेव वृक्ष आहे. दररोज हजारो एकाकी प्रेमवीर या झाडाला पत्र लिहून आपल्याला अनुरूप जोडीदार मिळावा अशी इच्छा व्यक्त करीत असतात.

हा भला मोठा ओक वृक्ष ‘ब्राईडग्रूम्स ओक’ या नावाने ओळखला जात असून, पाचशे वर्षापासून उभ्या असलेल्या या वृक्षाला दैवी शक्ती प्राप्त आहे असे म्हणतात. लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असे म्हटले जाते खरे, पण निदान उत्तर जर्मनीतील युटीन गावामध्ये लग्नाच्या गाठी जुळविण्याचे काम हा वृक्ष करीत असल्याचे मार्टेन्स म्हणतात. या वृक्षाच्या सहाय्याने आजवर अनेकांना आपल्या आयुष्याचे जोडीदार भेटले असल्याचे मार्टेन्स म्हणतात. या वृक्षाच्या ‘मॅच मेकर्स ओक’ या नावामागे अनेक आख्यायिका आहेत. त्यातील एका आख्यायिकेच्या अनुसार एकदा एक राजकुमार या जंगलामध्ये हरविला असता, एका सुंदर मुलीने त्याचे प्राण वाचविले. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राजपुत्राने तिच्यासाठी जे झाड लावले, तोच हा ओक वृक्ष असल्याचे म्हटले जाते.

आणखी एका आख्यायिकेच्या अनुसार १८९० साली जवळच असलेल्या लाईपझिश शहरामधल्या एका चॉकोलेटियर (चॉकोलेट बनविणारा)चे एका मुलीवर मन जडले. मात्र त्या मुलीच्या पित्याचा या प्रेमसंबंधांना विरोध असल्याने त्या दोघांना एकमेकांना भेटण्याची परवानगी नव्हती. त्यावेळी हे दोघे एकमेकांना प्रेमपत्र लिहून ती या भव्य वृक्षाच्या ढोलीमध्ये लपवित असत. कालांतराने मुलीच्या पित्याचा विरोध मावळला आणि त्याने या दोघांच्या विवाहाला संमती दिली. त्या दोघा प्रेमवीरांचा विवाह त्याच ओक वृक्षाखाली पार पडला. तेव्हापासून आपल्यालाही आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा या हेतूने अनेक प्रेमवीरांनी या झाडाला पत्रे लिहीण्यास सुरुवात केली. जे प्रेमवीर या झाडाला पत्र लिहून आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा अशी इच्छा व्यक्त करीत असतात त्यांना एका वर्षाच्या आत त्याच्या मनासारखा जोडीदार मिळून त्यांचा विवाह संपन्न होतो अशी मान्यता येथे रूढ आहे. म्हणूनच आता या झाडाला ‘ब्राईडग्रूम्स ओक ‘ या नावाने ओळखले जाते.

Leave a Comment