रोजच्या जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांनी स्वतःसाठी देखील द्यावा वेळ


ऑफिसमधील कामाची, घरातील लहानमोठ्या कामांची, मुलांची जबाबदारी, घरातील नातेवाईकांचे, पाहुणे- मित्रमंडळींचे येणे जाणे, सण समारंभ, इतक्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पडत असताना स्वतःकडे मात्र महिला थोडेफार दुर्लक्षच करीत असतात. ज्या अगदी आवर्जून स्वतःसाठी थोडाफार वेळ काढतात, त्यांच्या डोक्यामध्ये देखील शिल्लक राहिलेल्या कामांचा हिशोब सतत चालू असतोच. त्यामुळे अनेकदा व्यावसायिक जीवन आणि खासगी आयुष्यामधील संतुलन सांभाळणे ही महिलांच्या बाबतीत तारेवरली कसरत ठरत असते. सध्याची सामाजिक रचना पाहता महिलेचे कार्यक्षेत्र दोन हिश्श्यांमध्ये विभागलेले आहे, ते म्हणजे व्यवसाय आणि घर. या दोन्ही ठिकाणी महिलांनी आपल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडणे अपेक्षित असते. मात्र एक सांभाळताना दुसरीकडे थोडीफार तडजोड करावी लागतेच, आणि ही तडजोड बहुतेक वेळी खासगी आयुष्याच्या बाबतीतच केली जात असते. सतत तडजोड करीत असतानाही व्यवसायिक आणि खासगी आयुष्याचे संतुलन व्यवस्थित राखता येतेच असे नाही, आणि परिणामी मनावर सतत एकप्रकारचा तणाव जाणवू लागतो. अशा परिस्थतीमध्ये महिलांना स्वतःसाठी वेळच देता येत नाही. ही परीस्थिती टाळण्यासाठी महिलांनी काही गोष्टी विचारात घ्यायला हव्या.

घराच्या, व्यवसायाच्या आणि व्यक्तिगत जबाबदाऱ्या पार पडत असताना देखील अनेकदा यातील तारतम्य बिघडत जाते. यामागे कारण एवढेच, की कधी कधी आपल्याला करायच्या कामांची प्राथमिकता आपल्याला निश्चित करता येत नाही. सर्व जबाबदाऱ्या एकाच वेळी पार पाडण्याच्या हट्टापायी सर्वच कामांचा गुंता होऊन बसतो आणि परिणामी स्वतःसाठी महिला वेळ देऊ शकत नाहीत. अशा वेळी कोणती कामे महत्वाची आहेत, कोणती सावकाशीने केली तरी चालतील या बाबत विचार करून कामांची प्राथमिकता निश्चित करावी. प्रत्येक कामाची व्यवस्थित आखणी केल्यास त्या कामासाठी आपल्याला किती वेळ खर्च करावा लागणार आहे याचा अंदाज येऊ शकतो. त्यानुसार वेळेचे नियोजन केल्याने महिला, स्वतःसाठी थोडा वेळ निश्चित वेगळा ठेऊ शकतात.

घरातील किंवा घराशी निगडित प्रत्येक कामाची जबाबदारी स्वतःच घेणे आवश्यक नाही. आपल्या घरातील इतर सदस्यांना देखील काही कामांची जबाबदारी महिलांनी द्यावी. घरातील झाडांना पाणी घालणे, पुस्तके, वर्तमानपत्रे जागेवर ठेवणे, कपड्यांच्या घड्या घालणे, बाहेरून सामान आणणे इत्यादी लहानसहान कामे घरातील इतर मंडळी सहज करू शकतात. या लहानमोठ्या कामांची जबाबदारी कमी झाल्याने महिलांना थोडा मोकळा वेळ निश्चित मिळू शकतो.

Leave a Comment