आता घरच्या घरी बनवा स्वादिष्ट ‘कुलचे’


खास पंजाबी छोल्यांच्या जोडीला गरमागरम भटुरे, पुऱ्या किंवा कुलचे सर्व्ह केले जातात. कुलचा हा पदार्थ उत्तर भारतामध्ये विशेष लोकप्रिय असला, तरी आता भारतामध्ये सगळीकडेच कुलचा पसंत केला जात आहे. यामध्ये प्लेन कुलचा, स्टफ्ड कुलचा हे पदार्थही विशेष लोकप्रिय आहेत. मात्र तयार कुलचा बाजारामधून विकत आणण्याच्या ऐवजी बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या किंवा हॉटेलमधल्या चविष्ट कुलच्यासारखाच चविष्ट कुलचा घरच्याघरी देखील तयार करता येऊ शकतो. यासाठी लागणारे साहित्य आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध असते.

कुलचा बनविण्यासाठी दोन कप मैद्यामध्ये एक लहान चमचा इंस्टंट ड्राय अॅक्टिव्ह यीस्ट, चवीनुसार मीठ, एक लहान चमचा साखर घालून हे मिश्रण एकत्र करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणामध्ये कोमट पाणी घालून मैदा सैलसर मळून घ्यावा. हा मैदा मळण्यासाठी साधारण पावणेदोन कप कोमट पाण्याची आवश्यकता असते. मैदा सैलसर मळून झाल्यानंतर त्यावर थोडे तेल लावून हा मैद्याचा गोळा चांगला एकजीव होई पर्यंत मळून घ्यावा. तयार झालेल्या पिठावर झाकण घालून हे पीठ दीड ते दोन तास, किंवा पीठ चांगले फुगून येईपर्यंत झाकून ठेवावे. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे पीठ दीड ते दोन तासांमध्ये चांगले फुगते, तर थंडीच्या दिवसांमध्ये पीठ फुगून येण्यासाठी अडीच ते तीन तासही लागू शकतात.

पीठ चांगले फुगले, की पीठ हाताला चिकटू नये यासाठी हाताला कोरडा मैदा लावून घेऊन हे पीठ हळुवार पुन्हा मळून घ्यावे. आता या पीठाचे सहा एकसारखे गोळे करून घ्यावेत. गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर झाकण घालून ठेवावे. हा तवा झाकण लावून मंद आचेवर गरम होऊ द्यावा. पिठाचा प्रत्येक गोळा लंबगोल आकारामध्ये लाटायचा असून, हा गोळा थोडासा लाटून झाल्यावर त्यावर कसुरी मेथी भुरभुरावी, आणि गोळा पुन्हा लाटावा. हा गोळा जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटू नये. गरम होत असलेल्या तव्यावर, तव्याच्या आकाराप्रमाणे गोल बटर पेपर कापून घालावा. त्यामुळे कुलच्यावर काळसर डाग येत नाही. बटर पेपर नसल्यास साधा कागद गोलाकार कापून घेऊन त्यावर थोडे तेल लावून हा कागद तव्यावर पसरून ठेवावा.

कुलचा लाटून झाल्यावर हा कुलचा तव्यावर ठेवावा. हे कुलचे मंद आचेवर शेकावे. कुलचा तव्यावर घातल्यावर तव्यावर झाकण घालावे आणि कुलचा दोन मिनिटे भाजावा. त्यानंतर कुलचा तव्यावर उलटून टाकावा, आणि परत झाकण घालून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यावा. अशा प्रकारे सर्व कुलचे भाजून घ्यावेत. हे कुलचे घट्ट झाकणाच्या डब्यामध्ये घालून ठेवावेत. हे कुलचे तीन ते चार दिवस चांगले टिकतात. छोले किंवा एखाद्या कालवणाबरोबर कुलचा खाण्यासाठी, तयार करून ठेवलेले कुलचे तव्यावर तूप सोडून त्यावर खरपूस भाजून घ्यावेत आणि गरमागरम सर्व्ह करावेत.

Leave a Comment