हरभजन सिंगच्या पदार्पणाच्या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज


गेल्या काही दिवसांपासून आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग व्यस्त आहे. ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून तो लवकरच अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी शेअर करण्यात आला होता. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर शेअर करण्यात आले आहे.

आपल्या वाढदिवसानिमित्त हरभजन सिंगने ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण करत असल्याची घोषणा केली. दिग्गज क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि लोसलिया यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट एक संपूर्ण मनोरंजन पॅकेज असणार आहे. सिंग आणि त्याच्या मित्रांसोबत ‘रापचिक’ अवतारातील एक आकर्षक पोस्टर आणि लिरिकल व्हिडीओ शेअर करून या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता निर्मात्यांनी वाढवली आहे.


या आधी एका चित्रपटात हरभजन सिंग पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. पण आता ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटात तो मूख्य भूमिकेत दिसणार आहे. पंजाबमध्ये प्रचंड लोकप्रियता लाभलेला आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीमुळे प्रसिद्धीच्या झोतात असलेला हरभजन सिंग सध्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

हरभजन आणि त्याच्या मित्रांची कथा ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असेलला हरभजन आपल्या मित्रांसोबत मिळून सीनिअर्सच्या रॅगिंगपासून स्वत:ला कसे वाचवतो, हे चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट या वर्षी हिंदी, तेलुगु आणि तमिळ भाषेत रिलीज होणार आहे.

पॉल राज आणि सूर्या ‘फ्रेंडशिप’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. यामध्ये अर्जुन आणि तमिळ ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लोसलिया मारियानेसन ही अभिनेत्री दिसणार आहे. गेल्या वर्षी ७ ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. पण कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.