तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री


डेहराडून : उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा दिल्यामुळे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर उत्तराखंडच्या नवीन मुख्यमंत्र्यांची घोषणा झाली आहे. पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुष्कर सिंह धामी आज संध्याकाळी सहा वाजता राज्याचे 11 मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

भाजप युवा मोर्चाचे पुष्कर सिंह धामी हे प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. तसेच, ते आरएसएसचे जवळचे मानले जातात. पुष्कर सिंह धामी हे ऊधमसिंह नगर जिल्ह्यातील खटीमा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. पक्षातील तरुण आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांची ओळख आहे.

उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी, माजी प्रदेशाध्यक्ष बिशनसिंग चुफल किंवा त्रिवेंद्र सिंह रावत यांच्यापैकी कोणाचीही निवड केली जाईल, अशी शक्यता वर्तविली जात होती. दरम्यान, तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर दुपारी तीन वाजता देहरादूनमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक बोलविण्यात आली आहे. अखेर या बैठकीत पुष्कर सिंह धामी यांचे नाव उत्तराखंडच्या मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित झाले.

दरम्यान, तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्या संबंधित बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत होत्या. उत्तराखंडमध्ये पुन्हा मुख्यमंत्री बदलू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. अखेर तीरथ सिंह रावत यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी संध्याकाळी तीरथ सिंह रावत यांनी राज्यपाल बेबी रानी मौर्य यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला.

उत्तराखंडमध्ये विधानसभेच्या गंगोत्री आणि हल्द्वानी या दोन जागा झाल्या रिक्त आहेत. तेथे पोटनिवडणूक घेतली जाणार आहे. पण राज्यात पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणूक होणार असल्यामुळे सदस्यत्वाचा एका वर्षापेक्षा कमी कालावधी उरला आहे. अशा परिस्थितीत कायदेतज्ज्ञांच्या मते निवडणूक घेणे, हे निवडणूक आयोगाच्या म्हणण्यावर अवलंबून असेल.