धनगर आरक्षणासाठी लढा देणाऱ्या संघटनेची गोपिचंद पडळकर यांच्यावर टीका


अहमदनगर : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर हे आपल्या भडक वक्तव्यांमुळे कायम प्रसिद्धीच्या झोतात असतात. पण आता त्यांचा अंतर्विरोध वाढत चालला आहे. त्यांच्या भूमिकेवर धनगर आरक्षणासाठी लढा देत असलेल्या ‘जय मल्हार’ सेनेने नाराजी व्यक्त केली आहे. बिरोबाची शपथ घेऊन भाजपला मतदान करू नका म्हणणारे पडळकर स्वार्थासाठी स्वत:च भाजपमध्ये गेले आहेत. ते राजकारणासाठी पुढे काहीही करू शकतात, अशी टीका जय मल्हार सेनेचे सरसेनापती लहुजी शेवाळे यांनी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोपीचंद पडळकर हे स्वत:ला धनगर समाजाचे नेते म्हणून प्रस्थापित करू पाहात आहेत. पण पडळकर यांच्यावर आता धनगर आरक्षणासाठी लढा देणाऱ्या संघटनेनेच निशाणा साधला आहे. धनगर आरक्षणासाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी शेवाळे यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधण्यात आला.

शेवाळे पडळकर यांच्याबद्दल बोलताना म्हणाले, राजकारणासाठी पडळकर काहीही करू शकतात. त्यांनी एकदा समाजाच्या मेळाव्यात बिरोबाची शपथ घेऊन भाजपला मतदान करू नका, असे सांगितले होते. आता त्यांनीच ती शपथ विसरून म्हणजे बिरोबालाही बाजूला सारून स्वार्थी राजकारणासाठी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यातून त्यांना आमदारकी मिळाली. त्यांना यापुढे जे पाहिजे असेल, त्यासाठी ते काहीही करू शकतात. समाजाच्या प्रश्नापेक्षा ते राजकारणच जास्त करतात, अशी टीका शेवाळे यांनी केली.