कल्पना चावला यांच्यानंतर आणखी एक भारतीय वंशाची महिला लवकरच करणार अंतराळ सफर


वॉशिंग्टन : आपल्यापैकी अनेकांना अंतराळ प्रवास करावा, असे वाटते. पण, अंतराळ सफर प्रत्येकाला करणे शक्य नसते. पण याबाबत काही व्यक्ती नशीबवान ठरतात आणि त्यांना अशी संधी मिळते. सिरीशा बांदला हे एक नाव त्यापैकीच म्हणता येईल.

11 जुलैला व्हर्जिन गॅलॅक्टिकचे मालक आणि प्रसिध्द उद्योगपती रिचर्ड ब्रेनसन अंतराळ सफरीसाठी रवाना होत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय वंशाची सिरीशा बांदला देखील अंतराळात जाणार आहे. व्हर्जिन गॅलॅक्टिक कंपनीमध्ये सिरीशा बांदला सरकारी कामकाज आणि संशोधन कार्याशी संबंधित अधिकारी आहेत. रिचर्ड यांच्यासोबत अंतराळ प्रवासासाठी अन्य 5 जण जात आहेत.

धोकादायक अशा अंतराळ प्रवासाला जाणारी भारतात जन्मलेली सिरीशा ही दुसरी महिला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर हे सिरीशाचे मूळ गाव. यापूर्वी दिवंगत अंतराळ शास्त्रज्ञ कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या, पण त्यांचा दुर्देवाने स्पेस शटल कोलंबियाच्या दुर्घटनेत मृत्यू झाला. 2015 मध्ये व्हर्जिन कंपनी सिरीशा बांदलाने जॉईन केल्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही.

व्हर्जिन ऑर्बिटचे वॉशिंग्टन येथील कामकाज सिरीशा बांदला पाहते. या कंपनीने नुकतेच बोईंग 747 विमानाच्या मदतीने एक उपग्रह अंतराळात पाठवला होता. सिरीशाने जॉर्ज टाऊन युनिव्हर्सिटीतून एमबीए केले आहे. कल्पना चावला यांच्यानंतर सिरीशा ही अंतराळात जाणारी दुसरी भारतीय महिला ठरणार आहे.


राकेश शर्मा भारताकडून सर्वप्रथम अंतराळात गेले होते. त्यांच्यानंतर कल्पना चावला अंतराळात गेल्या होत्या. तसेच भारतीय वंशाच्या सुनीता विलियम्स यांनी देखील अंतराळावर पाऊल ठेवले होते. अमेरिकेतील अंतराळयान कंपनी व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या रिचर्ड ब्रेनसन यांनी आपले सहकारी अब्जाधीश जेफ बेझोस यांच्यासह 9 दिवस आधी अंतराळ यात्रेचे नियोजन केले आहे.

गुरुवारी संध्याकाळी ब्रेनसन यांच्या कंपनीने जाहिर केले की 11 जुलै रोजी त्यांचे पुढील अंतराळ उड्डाण होईल आणि या सफरीमध्ये संस्थापकांसह अन्य 6 जण सहभागी होतील. हे अंतराळ यान न्यू मेक्सिको येथून उड्डाण करेल. या यानाचे सर्व क्रू सदस्य कंपनीचे कर्मचारी असतील. व्हर्जिन गॅलॅक्टिकचे अंतराळात हे चौथे उड्डाण असेल.

बेझोस यांची कंपनी ब्लू ओरिजीनने ही बातमी जाहिर होण्यापूर्वी काही तास अगोदर सांगितले की बेझोस 20 जुलैला अंतराळ सफरीला निघतील. यावेळी त्यांच्या समावेत एरोस्पेस क्षेत्रातील एक अग्रणी महिला असेल. ही महिला अंतराळात जाण्यासाठी 60 वर्षांपासून प्रतीक्षा करीत आहे.