कोरोना प्रतिबंधक लस घेतली असेल तरच ‘ही’ महानगरपालिका देणार पगार


पुणे – राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबवली जात असून राज्य तसेच जिल्हा स्तरावर प्रशासनाकडून यासाठी प्रत्येकाने लस घ्यावी प्रयत्न सुरु आहे. सर्वसामान्यांसोबत अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनीही अद्याप लस घेतलेली नाही. पण पिंपरी चिंचवडमधील अशा सरकारी कर्मचाऱ्यांना आता लस घेतली नाही, तर पगार मिळणार नाही. तसा आदेशच पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांनी काढला आहे. कर्मचाऱ्यांना यासाठी आयुक्तांनी २० जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.

महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी यासंदर्भातील आदेश काढत कर्मचाऱ्यांना लस घेण्याची ताकीद दिली आहे. एकूण ७ हजार ४७९ अधिकारी आणि कर्मचारी महानगरपालिकेत काम करतात. परंतु, वारंवार सूचना करुन देखील अनेकांनी लसीकरण करून न घेतल्यामुळे पगार स्थगित करण्याची वेळ येऊ देऊ नका असा इशाराच आयुक्तांनी दिला आहे.

एकूण ७४७९ अधिकारी, कर्मचारी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेत काम करतात. तर, मानधन, ठेकेदार पद्धतीने काम करणारे अनेक कर्मचारी आहेत. देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरू आहे. पण, अनेकांच्या मनात संभ्रम अवस्था असल्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली नाही अशी परिस्थिती आहे. दरम्यान, महानगरपालिकेने वारंवार सूचना करुनही अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेतलेले नाही.

काही जणांनी पहिला डोस घेतला आहे, तर काही जणांनी दुसरा घेतला नाही अशी अवस्था आहे. त्यामुळेच महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांना 20 जुलैची मुदत दिली असून लसीचे दोन्ही डोस न घेतल्याचे निदर्शनास न आल्यास त्यांचा जुलै महिन्याचा पगार स्थगित करण्याचा विचार केला जाईल, अशी शक्यता आयुक्तांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची येणाऱ्या काही दिवसांमध्ये लसीकरणासाठी धावपळ करतील असे चित्र पाहायला मिळेल एवढे मात्र नक्की.