लोकलमध्ये होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी क्यूआर कोड लागू करण्याच्या विचारात राज्य सरकार


मुंबई : लोकल ट्रेनमध्ये फेक आयकार्ड वापरुन होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार पुन्हा एकदा क्यूआर कोड असलेल्या पासची सिस्टीम लागू करण्याच्या विचारात असून याला युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास म्हटले जाईल. क्यूआर कोड असलेला हा पास केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. हा पास असेल तरच लोकलमध्ये प्रवेश असेल.

मध्य रेल्वेतून रोजचे प्रवासी तब्बल 18 लाखांच्या आसपास, पश्चिम रेल्वेवर रोजचे प्रवासी तब्बल 12 लाखांच्या घरात प्रवासी प्रवास करतात. पण फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये प्रवेश असताना एवढे प्रवासी कसे असा प्रश्न पडला असेल. तर नकली आयकार्ड्स आणि विनातिकीट चढलेले प्रवासी त्याचे कारण आहे. सरकारी संस्थेचा किंवा आरोग्य सेवेतील कर्मचारी म्हणून नकली ओळखपत्र बनवून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांचा सुळसुळाट वाढल्यामुळे राज्य सरकार आता पुन्हा क्यूआर कोड असलेली यंत्रणा राबवणार आहे. क्यूआर कोड असलेले युनिवर्सल आयकार्ड्स अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना देण्यात येईल आणि ते असेल तरच रेल्वे स्थानकात प्रवेश देण्यात येईल. हे युनिवर्सल आय कार्ड कसे मिळवायचे त्यासाठी राज्य सरकारने खास पोर्टल तयार केले आहे.

यात अत्यावश्यक सेवेतील आस्थापनेचा सर्वात महत्वाचा भाग असेल. एकदा हे आयकार्ड मिळाल्यानंतर रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवर ते दाखवावे लागेल. तरच तुम्हाला तिकीट किंवा पास दिला जाईल. या संदर्भात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या महासंचालकांना राज्य सरकारने पत्र दिल्याचे म्हटले आहे. पण ही यंत्रणा कधीपासून लागू करण्यात येईल याबाबतची माहिती त्या पत्रात देण्यात आलेली नाही. राज्य सरकार जरी ही यंत्रणा राबवण्याच्या तयारीत असेल तरी प्रवाशांकडून संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली, तरी राज्य सरकार समोर दोन मोठी आव्हाने सध्या आहेत. डेल्टा प्लस आणि कोरोनाची तिसरी लाट यामुळे राज्य सरकार अतिशय सावधपणे निर्णय घेत आहे. अशात लोकलमधील गर्दी कमी केली नाही, तर इतर उपाययोजनांचा काहीच फायदा होणार नाही, हे देखील राज्य सरकारला माहित असल्यामुळेच नवीन युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास देण्यात येणार आहे.