किम जोंग उनचे वजन कमी झाल्याने नागरिक शोकमग्न?

उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उन याच्याविषयी देशाचे नागरिक चिंतेत पडले आहेत आणि त्यांना अश्रू अनावर होत असल्याचे वृत्त सरकारी प्रसारकाने दिले आहे. नागरिकाना अश्रू अनावर होण्याचे कारण किम जोंग उनचे कमी झालेले वजन असल्याचा दावा सुद्धा केला जात आहे.

या महिन्याच्या सुरवातीला किम जोंग उन यांचे वजन २० किलोनी कमी झाल्याचे सांगितले गेले होते. धष्टपुष्ट किम जोंग उनचे फोटो सातत्याने पाहिलेल्या जनतेला बारीक झालेला किम पाहून त्याच्या स्वास्थ्याविषयी चिंता वाटू लागल्याचे सांगितले जात आहे.

उत्तर कोरिया सरकारी ब्रॉडकास्ट केआरटी वरून शुक्रवारी प्रसारित झालेल्या बातमीनुसार आपला नेता इतका दुबळा झालेला पाहून जनता अतिशय दुःखी झाली आहे. मिडिया रिपोर्टमध्ये असा दावा केला गेला आहे की ३७ वर्षीय किम याचे वजन खुपच कमी झाल्याचे व्हिडीओ मध्ये नागरिकांना दिसल्यावर त्यांना अश्रू आवरणे कठीण झाले. प्योगपोंग मध्ये एका मोठ्या स्क्रीनवर प्रसारित झालेल्या एका कार्यक्रमात किम जोंग बारीक झाल्याचे दिसल्यावर नागरिकांना रडू आवरणे शक्य होत नव्हते.