शाही घराण्यातील स्त्रियांना शाही मुकुट परिधान करण्यासाठी आहेत खास नियम


शाही परिवार म्हटले, की भरजरी पोशाख, अनेक सुंदर हिऱ्या-मोत्यांची, मौल्यवान रत्नांची आभूषणे आणि मस्तकावर शोभणारा हिरेजडीत मुकुट अशी प्रतिमा आपल्या डोळ्यांसमोर उभी राहते. मात्र ब्रिटीश शाही परिवारातील स्त्रिया नेहमी सर्वच औपचारिक समारंभांना मुकुट (tiara) वापरतीलच असे नाही. किंबहुना हे मुकुट स्त्रियांनी कधी आणि कोणत्या समारंभासाठी वापरावेत याचे निश्चित नियम आहेत. त्या नुसारच खुद्द राणी एलिझाबेथ आणि शाही परिवारातील इतर स्त्रिया मुकुट परिधान करू शकतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अलीकडेच ब्रिटनभेटीला गेलेले असताना त्यांच्या सन्मानार्थ आयोजित खास औपचारिक मेजवानीसाठी (state banquet) राणी एलिझाबेथ आणि शाही परिवारातील उपस्थित सर्व स्त्रियांनी मौल्यवान रत्नांनी अलंकृत मुकुट परिधान केले होते. ब्रिटीश शाही घराण्यामध्ये मुकुट परिधान करण्याचे अधिकार केवळ विवाहित स्त्रियांना आहेत. त्यामुळे शाही घराण्यातील राजकुमारी किंवा शाही घराण्यातील एखाद्याशी विवाह करून शाही घराण्यात समाविष्ट होत असणारी वधू यांनी विवाहसमारंभासाठी मुकुट धारण करण्याची परंपरा आहे. शाही परिवारामध्ये जन्मलेल्या अविवाहित राजकुमारीला विशिष्ट प्रसंगी मुकुट परिधान करण्याची अनुमती आहे. मात्र यासाठी या अविवाहित महिलेला ‘राजकुमारी’ ही उपाधी बहाल केलेली असणे गरजेचे आहे.

अलीकडेच राणी एलिझाबेथचे चुलत भाऊ प्रिन्स मायकल ऑफ केंट यांच्या मुलीचा विवाह झाला. पण त्यांच्या मुलीला ‘राजकुमारी’ ही उपाधी बहाल करण्यात आली नसल्याने विवाहापूर्वी मुकुट परिधान करण्याची अनुमती तिला नव्हती. शाही घराण्यातील स्त्रियांना मुकुट परिधान करण्याची मुभा असली, तरी हे मुकुट ठराविक वेळी परिधान केले जाण्याची पद्धत रूढ आहे. शाही परंपरेच्या अनुसार स्त्रियांनी आपले मुकुट संध्याकाळी सहा नंतरच्या औपचारिक कार्यक्रमांसाठी परिधान करावयाचे असतात. शाही नववधूला मात्र सकाळी पार पडणाऱ्या विवाहविधींसाठी मुकुट परिधान करण्याची मुभा असते. केवळ अतिमहत्वाच्या औपचारिक समारंभाकरिता (white tie event) मुकुट परिधान केले जात असल्याने या समारंभांसाठी परिधान केले जाणारे पोशाखही अतिशय खास असतात.

कोणता मुकुट परिधान करायचा हे ठरविण्याचे स्वातंत्र्य स्त्रियांना असून, राणी एलिझाबेथच्या संग्रही अनेक मौल्यवान मुकुट आहेत. या संग्रहातील मुकुट वापरण्याची मुभा शाही घराण्यातील स्त्रियांना असून राणी एलिझाबेथच्या परवानगीने हे मुकुट समारंभासाठी मागून घेऊन, परिधान करण्यात येऊन, त्यानंतर पुनश्च राणीच्या खासगी आभूषणांच्या संग्रहामध्ये परत पाठविले जातात. राणी एलिझाबेथने आपल्या सुनांना आणि नातसुनांना सुंदर मुकुट भेटीदाखलही दिलेले आहेत. त्यामुळे या महिला अनेकदा हे मुकुटही परिधान करताना पाहायला मिळतात.

Leave a Comment