कच्ची पपई आहे आरोग्यास फायदेशीर


पपई या फळाचे अनेकविध फायदे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच. हे फळ जीवनसत्वांनी परिपूर्ण असून उत्तम रेचक असल्याने पचनशक्ती सुधारणारे आहे. या फळाच्या सेवनाने त्वचा, डोळे आणि केसांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. पपई प्रमाणेच पपईच्या बियादेखील आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. पपई शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी आहे. त्यामुळे या फळाचे सेवन करण्याचा सल्ला आहारतज्ञ नेहमीच देत असतात. कच्ची पपई मात्र आहारामध्ये क्वचितच वापरली जात असते, मात्र हे फळदेखील आहाराच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर आहे. यामध्येही जीवनसत्वे मुबलक प्रमाणामध्ये असली, तरी कच्ची पपई पिकलेल्या पपईप्रमाणे नुसतीच कापून खाता येत नाही. त्यामुळे कच्च्या पपईचे सेवन चटणी, भाजी, किंवा पराठे या स्वरूपात करणे चांगले.

कच्ची पपई मधुमेहींसाठी उत्तम आहे. याच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होऊन इंस्युलीनची मात्रा वाढण्यास मदत होते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी आपल्या आहारामध्ये कच्च्या पपईचा समावेश आवर्जून करायला हवा. कच्च्या पपईच्या नियमित सेवनाने कोलन आणि प्रोस्टेटचा कर्करोग उद्भवण्याची शक्यता पुष्कळ अंशी कमी होते. कच्च्या पपईमध्ये असलेले फायटो न्यूट्रीयंट्स, फ्लॅवनॉइड्स, आणि अँटी ऑक्सिडंट्स शरीरामध्ये कर्करोगाच्या पेशींची वाढ होऊ देत नाहीत. त्यामुळे कच्च्या पपईचे सेवन नियमित केले जाणे उपयुक्त ठरते.

आजच्या धावत्या युगामध्ये व्यायामाचा अभाव, असंतुलित आहार आणि मानसिक तणावामुळे उद्भवणारे हार्मोन्सचे असंतुलन या सर्व कारणांमुळे सातत्याने वाढणारे वजन हा पुष्कळांच्या चिंतेचा विषय आहे. वाढणारे वजन नियंत्रित ठेवण्याकरीता कच्च्या पपईचा उपयोग होतो. याच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी घटण्यास मदत होते. वजन घटविण्यासाठी कच्च्या पपईचा वापर करायचा झाल्यास कच्ची पपई सोलून ती किसावी आणि दह्यामध्ये मिसळून त्याचे सेवन करावे. कच्ची पपई सॅलडमध्येही समाविष्ट केली जाऊ शकते. युरीनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (युटीआय) झाले असल्यासही कच्च्या पपईचे सेवन यासाठी उपयुक्त आहे.

ज्यांना संधिवात आहे, त्यांच्यासाठी देखील कच्च्या पपईचे सेवन उपयुक्त असून, त्यासाठी दोन लिटर पाणी उकळावे. कच्ची पपई चिरून त्यातील बिया काहून घ्याव्यात आणि उकळत्या पाण्यामध्ये घालून हे पाणी पाच मिनिटे उकळू द्यावे. यामध्ये दोन चमचे ग्रीन टी घालून आणखी काही सेकंद हे पाणी उकळावे. त्यानंतर आच बंध करून हे मिश्रण थंड होऊ देऊन त्यानंतर हे पाणी गाळून घेऊन एका बाटलीमध्ये भरून घ्यावे. या पाण्याचे सेवन दिवसभर करीत राहावे. कच्च्या पपईचे सेवन यकृताच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. तसेच ज्या स्त्रिया आपल्या नवजात अर्भकांना स्तनपान करवीत असतील त्यांच्यासाठीही कच्च्या पपईचे सेवन उपयुक्त आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment