चीनमध्ये सध्या लोकप्रिय होत आहेत समुद्री काकड्या


उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणाऱ्या पदार्थांच्या सेवनामध्ये वाढ होताना दिसते. अशा पदार्थांमध्ये काकडीचाही समावेश आहे. बाजारामध्ये काकडी ही सहज उपलब्ध होणारी फळभाजी असून, शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढून शरीराला थंडावा देणारी ही फळभाजी आहे. मात्र बाजारामध्ये सर्वसाधारणपणे दहा-वीस रूपयांना मिळणाऱ्या काकडीची किंमत सत्तर हजार रुपये आहे हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. ही महागडी काकडी, सर्वसामान्य काकडीच्या प्रजातींपासून वेगळी असून, ही काकडी समुद्रामध्ये उगविणारी आहे. चीनमध्ये आजकाल या समुद्री काकड्या (cucumbers) खूप लोकप्रिय होत असून, चीनी लोकांच्या भोजनामध्ये या काकडीचा समावेश केला जात असतो.

एक किलो सुकविलेल्या समुद्री काकड्यांची किंमत साधारण एक हजार डॉलर्स असते. या काकड्या लांबीला चार ते अकरा इंच लांबीच्या असून, सर्वात छोट्या आकाराची समुद्री काकडी तीन मिलीग्राम लांबीची असते. या काकडीचा आकार गोलसर असून, वास्तविक ही काकडी म्हणजे एखादे फळ किंवा भाजी नसून समुद्रामध्ये वाढणारा एक जीव आहे. बाजारामध्ये विकल्या जाणाऱ्या या काकड्यांचे वजन प्रत्येकी चारशे ते साडेचारशे ग्रामचे असते.

या समुद्री काकड्या समुद्रातून काढून सुकाविण्यासाठी यांना मातीमध्ये पुरण्यात येते. त्यानंतर मातीतून काढून घेऊन या काकड्या भट्टीमध्ये भाजल्या जाऊन त्यानंतर या विक्रीसाठी बाजारामध्ये उपलब्ध होत असतात. भोजनामध्ये वापरल्या जाण्यापूर्वी या काकड्या गरम पाण्यामध्ये उकळल्या जातात. पाण्यामध्ये उकळल्या गेल्यानंतर या काकड्या नरम होतात. त्यानंतर या काकड्या बारीक चिरून सॅलड प्रमाणे खाल्ल्या जातात. या काकड्यांचे सेवन सुप्रसिद्ध जपानी पदार्थ ‘सुशी’सोबतही केले जाते.

Leave a Comment