खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेश, तर अर्जुन पुरस्कारासाठी हरमनप्रीतला नामांकन


नवी दिल्ली – भारताचा सर्वात प्रतिष्ठित राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कारासाठी खेळाडूंना नामांकन देण्यात आले असून भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेश आणि माजी महिला हॉकीपटू दीपिका यांना हॉकी इंडियाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन दिले आहे. त्याचबरोबर हरमनप्रीत सिंग, वंदना कटारिया आणि नवजोत कौर यांची नावे अर्जुन पुरस्कारासाठी पाठवण्यात आली आहेत.

भारताकडून १००हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने हरमनप्रीतने खेळले आहेत तर वंदनाने २०० पेक्षा जास्त आणि नवजोतने १५०हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तर मेजर ध्यानचंद आजीवन पुरस्कारासाठी भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आरपी सिंग आणि संगई इबेमहल यांना नामांकन देण्यात आले आहे. त्याचबरोबर हॉकी इंडियाने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी प्रशिक्षक बी.जी. करीअप्पा आणि सीआर कुमार यांची नावे पाठवली आहेत. क्रीडा मंत्रालयाची समिती विजेत्यांची नावे निवडणार आहे.

१९९१-९२मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार सुरू करण्यात आला. ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद हा पुरस्कार प्राप्त करणारा पहिला खेळाडू होता. खेलरत्न पुरस्कार विजेत्यास २५ लाख रुपये देण्यात येतात. २०१८ मध्ये ही रक्कम ७.५ लाख अशी होती. चार वर्षातील गुणवत्ता, क्रीडा कौशल्य आणि शिस्त यासाठी अर्जुन पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कार विजेत्यास १५ लाख रुपये देण्यात येतात. याव्यतिरिक्त अर्जुनाचा पितळेचा पुतळा आणि प्रशस्तीपत्रक देण्यात येते.