आमदार विनायक मेटे यांना शिवीगाळ केल्या प्रकरणी गुन्हा दाखल


औरंगाबाद : गुरुवारी दुपारी येथे आमदार विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिमन्यु माकणे (रा. पडेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे, सचिन घनवट, राहुल यलदी तसेच अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माकणे यांच्या तक्रारीनुसार आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत पडेगाव येथील ईश्वर हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर शिवसंग्राम पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. राहुल यलदी व सचिन घनवट हे बैठकीतून बाहेर गेले व नंतर येताना सोबत पडेगाव येथील अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे व इतर पाच जणांना आणले. बैठकस्थळी येताच म्हस्के याने आमदार मेटे यांना शिवीगाळ केली.

तसेच, मेटे यांच्या आणि फिर्यादी माकणे यांच्या अंगावर घावून आला. तर घनवट, मुळे व इतरांनी टेबल ढकलून दिला. फिर्यादी व अन्य कार्यकर्त्यांनी या आरोपींची समजूत काढत बाहेर काढले. बैठक सुरू होताच आरोपींनी पुन्हा आता प्रवेश केला आणि नवनाथ मुळे, सचिन घनवट तसेच राहुल यांनी फिर्यादीला मारहाण केली. यात आरोपींपैकी कोणीतरी फिर्यादीच्या गळ्यातील एक लाख किमतीची सोन्याची चेनही लंपास केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

औरंगाबादेतील शहानूरमियाँ दर्गा मार्गावर शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळी ११ वाजता मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी संघर्ष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यात कोपर्डी व तांबडीच्या घटनांमधील आरोपींना फाशीची शिक्षा लवकर मिळण्यासाठी प्रयत्न करावेत, ही प्रमुख मागणीही करण्यात येणार आहे, असे मराठा क्रांती संघर्ष मोर्चाच्या वतीने कळवण्यात आले आहे.