२० हजार वर्षापूर्वी सुद्धा झाला होता करोना उद्रेक

गेले अठरा महिने जगभरात सर्वत्र करोनाचा धुमाकूळ सुरु आहे. मात्र ऑस्टेलियातील क्वीन्सलंड विद्यापीठातील जीववैज्ञानिक किरील अलेग्झांडर यांनी केलेल्या नव्या संशोधनात नवीनच माहिती पुढे आली आहे. किरील यांच्या म्हणण्यानुसार २० हजार वर्षापूर्वी सुद्धा पूर्व आशियाई देशात करोनाचा उद्रेक झाला होता. माणसाच्या बदललेल्या डीएनएवर संशोधन करताना ही बाब लक्षात आली. कोविड मुळे सध्या माणसाच्या डीएनए मध्ये जसे बदल दिसून आले आहेत तसेच बदल हजारो वर्षापूर्वीच्या डीएनए मध्ये झाल्याचे दिसले आहे.

किरील सांगतात प्राण्यांच्या मधून माणसाच्या शरीरात विषाणू प्रवेश करणे ही नवी घटना नाही. यापृवी असे अनेक आजार प्राण्यांमधून माणसात आलेल्या विषाणू मुळे झाले आहेत. २०१२ मध्ये चीन मधून पसरलेला सार्स विषाणू, त्यानंतरचा मार्स कोव ही त्याची अलीकडची उदाहरणे आहेत. आधुनिक मानवाच्या डीएनए वरून हजारो वर्षापूर्वी मानवाच्या डीएनए मध्ये कसे बदल झाले हे समजू शकते.

या नव्या संशोधनासाठी १ हजार जीन्स डेटाचा वापर केला गेला. तेव्हा एकेकाळी आत्तासारखाच डीएनए मध्ये बदल झाल्याचे दिसले आहे. चीन, जपान, मंगोलिया, उत्तर कोरिया, द. कोरिया आणि तैवान भागातील जनतेला करोनाचा प्रादुर्भाव झाला होता असे म्हणता येते. त्यावेळीही यावर औषध नव्हते पण माणसाच्या शरीरानेच हा विषाणू स्वीकारला त्यामुळे तो निष्क्रीय झाला असावा असे किरील यांचे म्हणणे आहे.