तब्बल ४३ वेळा करोनाची शिकार झाला हा वृद्ध

गेले अठरा महिने करोना विषाणूने साऱ्या जगाला वेठीला धरले आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा करोना संसर्ग होत असल्याचे मामले समोर येत आहेत. काही जणांना एकदा, काही जणांना दोन वेळा करोना झाल्याच्या केसेस खूप आहेत. पण ब्रिटन मधील ब्रिस्टल येथे राहणाऱ्या डेव स्मिथ या वृद्धाने करोना संसर्गाबाबत रेकॉर्ड केले आहे. त्यांना तब्बल ४३ वेळा करोना झाला असल्याचे समजते.

डेव निवृत्त ड्रायविंग प्रशिक्षक आहेत. करोना संसर्ग झाल्यामुळे त्यांना ७ वेळा रुग्णालयात हलविण्याची वेळ आली. बीबीसीच्या ला दिलेल्या एका मुलाखतीत डेव म्हणाले, ‘माझा उत्साह कमी होत होता. एका रात्री तर सतत पाच तास मला खोकला आला. जगण्याची माझी आशा मावळली होती. शेवटी मी माझ्या कुटुंब सदस्यांना बोलावले आणि त्यांना गुडबाय केले. पत्नी लीन ला मी म्हणालो जे चाललेय ते फार वाईट आहे. मी यापुढे हे सहन करू शकणार नाही. मला जाऊ दे.’

लीन सांगते, डेवची अवस्था खरेच खूप वाईट होती. तो यापेक्षा अधिक सहन करू शकणार नाही हे आम्हाला दिसत होते. डेव यांच्यावर अँटी व्हायरल औषध मिश्रण उपचार दोन आठवडे केले गेले. डॉक्टर वारंवार करोना चाचणी करत होते. दोन आठवडे हे उपचार घेतल्यावर डॉक्टरने जेव्हा करोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगितले तेव्हा प्रथम कुणाचाच विश्वास बसला नाही. एक आठवड्याने पुन्हा टेस्ट केली तेव्हा सुद्धा निगेटिव्ह रिपोर्ट आला आणि हा आनंद डेव याने शँपेनची बाटली उघडून साजरा केला.

ब्रिटन मध्ये करोनाची तिसरी लहर आली आहे. गंभीर मानल्या गेलेल्या करोना डेल्टा प्लसच्या केसेस यावेळी अधिक प्रमाणात आढळत असून त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. ब्रिटन मध्ये करोना लसीकरण जवळ जवळ पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.