डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियमावलीत केले महत्त्वपूर्ण बदल!


मुंबई – महाराष्ट्रात ५ टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर मागील दोन ते तीन आठवड्यांमध्ये नवे कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. त्यापाठोपाठ आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटमुळे देखील राज्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

डेल्टा प्लस कोरोना राज्याच्या काही जिल्ह्यांमधील रुग्णांमध्ये आढळून आल्यामुळे आणि त्याची संख्या हळूहळू वाढू लागल्यामुळे काही प्रमाणात पुन्हा निर्बंध घातले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आता आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल जाहीर केले आहेत. यानुसार राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यात पुन्हा कठोर निर्बंध?; राजेश टोपेंचे मोठे वक्तव्य
दरम्यान डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असल्यामुळे सध्या राज्यात चिंता व्यक्त आहे. सोबतच काही जिल्ह्यांतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत होणार वाढ आणि लॉकडाऊन शिथील होताच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी यामुळे राज्यात ठाकरे सरकारकडून पुन्हा कठोर निर्बंध लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे घाईघाईत व्यवहार खुले करू नका व गर्दी होणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही दिला आहे. यादरम्यान डेल्टा प्लसमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्वाची माहिती दिली आहे.

आतापर्यंत डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळले आहेत. पण हा व्हायरसमध्ये झालेला बदल (रिप्लेसमेंट) नाही. म्हणजे आधी डेल्टा होते आणि आता डेल्टा प्लसने त्याची जागा घेतली असे झालेले नाही. मोठ्या संख्येने रुग्ण नसले तरी बाधितांचा शोध सुरु आहे. सर्व जिल्ह्यांमधून १०० नमुने घेऊन त्याचा अभ्यास करत आहोत. यामध्ये लसीकरण केलेल्यांना पुन्हा संसर्ग झाला आहे का वैगेरे अशी बाबी समजून घेत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. २१ पैकी ८० वर्षाच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला असून इतर रुग्ण स्थिर आहेत. काहीजण बरे होऊन घरीदेखील गेले असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान राजेश टोपे यांना डेल्टा प्लसमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का? असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, निर्बंध लावण्याचे कोणतेही कारण नाही. आपण सर्वांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करत योग्य वर्तन ठेवणे गरजेचे आहे. ते जर पाळले, तर अडचण येण्याचे कारण नाही.

आरोग्य विभाग तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने तयारी करत असून या लाटेला थोपवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स स्थापन करण्यात आले असून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. तिसऱ्या लाटेपासून लहान मुलांना वाचवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला दिले असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली.