‘ईडी’चा धक्कादायक खुलासा; अनिल देशमुखांना १० बार मालकांनी दिले तीन महिने ४ कोटी रुपये !


मुंबई – अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी छापे टाकले आहेत. आता ईडीच्या या छापेमारीमागचे एक मोठे कारण समोर आले आहे. अनिल देशमुख यांना मुंबईतील १० बार मालकांनी सलग तीन महिने ४ कोटी रुपये दिले होते, अशी माहिती ईडीला मिळाली आहे. अनिल देशमुखांच्या निवासस्थानांवर ईडीने याच संदर्भात धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे.

आज सकाळपासून ईडीकडून चार विविध ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या आहेत. यात अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानांचाही समावेश आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. ईडीकडून अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासोबतच त्यांचे स्वीयसहाय्यक कुंदन शिंदे आणि खासगी सचिव संजीव पालांडे यांच्या घरावरही छापा टाकला आहे. अनिल देशमुख यांना मुंबईतील बार मालकांकडून रोख रक्कम देण्यात आल्याचे पुरावे ईडीच्या हाती लागले आहेत आणि याच आधारावर ईडीने आज छापे टाकल्याचे वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.

मुंबईतील १० बार मालकांचे आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जबाब ईडीने नोंदवले आहेत. अनिल देशमुख यांची पोलीस अधिकाऱ्यांना १०० कोटींच्या वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपाप्रकरणी सीबीआय चौकशी सुरू आहे. यात पैश्यांच्या व्यवहारातील धागेदोरे शोधण्यासाठी ईडीनेही याप्रकरणात उडी घेतली आहे. यातूनच ईडीच्या हाती काही धागेदोरे लागले आहेत. मुंबई पोलीसमधून निलंबित करण्यात आलेल्या सचिन वाझेने मुंबईतील बार मालकांकडून दरमहा ४० ते ५० लाख रुपये वसुल केल्याचा आरोप आहे.