पुण्यात दाखल झाली रशियन बनावटीची ‘स्पुटनिक व्ही’ लस


पुणे : सीरमची कोव्हिशिल्ड, भारत बायोटेकची स्वदेशी कोव्हॅक्सिन या कोरोना प्रतिबंधक लसीनंतर रशियन बनावटीची ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) ही लस आता पुण्यात दाखल झाली आहे. पुणेकरांसाठी पहिल्या टप्प्यात साधारण ६०० डोस उपलब्ध झाले आहे. या लसीच्या एका डोसची खासगी रुग्णालयांमध्ये किंमत ११४२ रुपये एवढी असणार आहे. पुणेकरांना स्पुटनिक व्ही लस २८ जूनपासून दिली जाणार आहे. या लसीच्या डोससाठी कोविन अ‍ॅप व पोर्टलवर नोंदणी करणे गरजेचे असणार आहे.

ही लस रशियामधील मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे विकसित करण्यात आली असून हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून स्पुटनिक व्ही लसीचे भारतातील वितरण सुरु आहे. राज्यातील व पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात स्पुटनिक व्ही लसीचा पहिला डोस काही दिवसांपूर्वी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या ३६ वर्षीय व्यक्तीला देण्यात आला होता, अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली आहे.

मागील सहा महिन्यांपासून पुणे, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाची व्यापक मोहीम सुरू आहे. मध्यंतरी लसींच्या तुटवड्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया काही प्रमाणात थंडावली होती. पण मागील काही दिवसांपासून लसींचा पुरवठा सुरळीत झाल्यामुळे लसीकरण मोहिमेला चांगली गती मिळाली आहे.

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनसह ‘स्पुटनिक व्ही’ या लसीच्या दोन डोसमधील अंतर निश्चित करण्यात आले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर स्पुटनिक व्ही लसीचा दुसरा डोस २१ दिवसानंतर घ्यायचा आहे. ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा उपयोग करण्यात आला आहे. स्पुटनिक व्ही लसीला भारतासह एकूण

दरम्यान स्पुटनिक व्ही या लसीच्या वापरासाठी ५५ देशांमध्ये मान्यता मिळाली आहे. भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात ही यशस्वी ठरु शकते, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच या लसीमुळे नागरिकांना लसीकरणासाठी तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. स्पुटनिक व्ही लसीमुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम गतिमान होण्यास मदत होणार आहे. स्पुटनिक व्ही लस कोरोनाविरुद्ध ९२ टक्के प्रभावी आहे.