अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरात ईडीचे छापे


नागपूर/मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील निवासस्थानी छापे टाकले आहेत. त्यांच्या घरात सकाळपासून झाडाझडती सुरु आहे. कारवाई दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपुरात नाहीत, शिवाय ते मुंबईतही नसल्याचे कळते. अनिल देशमुख दिल्लीत असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान गृहमंत्री असताना देशमुख यांचे ज्ञानेश्वरी या शासकीय निवासस्थानाचीही झाडाझडती होण्याची शक्यता आहे.

अनिल देशमुख यांना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या 100 कोटी रुपयांच्या कथित वसुलीप्रकरणात राज्याच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज (25 जून) ईडीने त्यांच्या नागपुरातील घरात छापेमारी सुरु केली आहे. ईडी वेगवेगळे कनेक्शन या प्रकरणात तपासू पाहत आहे.

देशमुख यांच्या मुंबईतील वरळी परिसरातील सुखदा या इमारतीमधील घरात आज (25 जून) सकाळी सात वाजता ईडीचे पथक दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत स्थानिक वरळी पोलीस देखील हजर होते. तर आज सकाळी आठ ते सव्वाआठच्या सुमारात या कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईबाबत अतिशय गुप्तता बाळगण्यात आली. याची कल्पना नागपूर पोलिसांनाही नव्हती. या छापेमारीदरम्यान ईडीसोबत पॅरामिलिटरी दलाचे कर्मचारी दाखल झाले आहेत. यात महिला कर्मचाऱ्यांचाही मोठा समावेश आहे. या कारवाईसाठी एवढी मोठी सुरक्ष का आणली असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

दरम्यान ईडीने महिन्याभरापूर्वी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित तीन व्यक्तींच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. 25 मे रोजी नागपुरातील शिवाजीनगर, न्यू कॉलनी आणि जाफरनगर परिसरात एकाच वेळी ईडीच्या विविध पथकांनी कारवाई केली होती. तसेच ईडीने सागर भटेवारा, समित आयजॅक्स आणि कादरी बंधू यांच्या ठिकाणांची झाडाझडती केली होती.