पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कोरोनामुळे घाला घातलेल्या जेजुरीमधील घोणे दाम्पत्याच्या दोन्ही मुलींचे पालकत्व आणि जबाबदारी स्वीकारली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीवर आज सकाळी घोणे कुटुंबावरील आघाताची बातमी प्रसारित झाली होती. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी लागलीच या बातमीची दखल घेत आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या चिमुकल्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.
खासदार सुप्रिया सुळेंनी स्वीकारले कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या दोन चिमुकल्यांचे पालकत्व
कोरोनामुळे जेजुरीमधील घोणे कुटुंबातील या दोन मुलींच्या आई-वडिलांचे निधन झाले. मोठी मुलगी साडेचार वर्षांची तर धाकटी मुलगी दीड वर्षांची आहे. वयोवृद्ध आजी-आजोबांवर आई-वडिलांच्या निधनानंतर दोघींचीही जबाबदारी आली. ही बातमी बघितल्यानंतर या दोघींचे पालकत्व स्वीकारणार असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, सकाळी मी आणि शरद पवारसाहेब दररोज वृत्तपत्र वाचतो. यावेळी बातम्यांचे चॅनल लावल्यानंतर ही धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी आम्ही पाहिली. त्यामुळे तातडीने निर्णय घेत या दोन्ही मुलींना मदत करणे हे कर्तव्य आहे. आमचे कुटुंब या मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत आहे. जेजुरीतील आमचे सहकारी दिलीपदादा बारभाई तातडीने कोणालातरी तिथे पाठवत आहेत. पाठपुरावा करुन त्यांच्या आजी-आजोबांना कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने त्यांची जबाबदारी आम्ही घेत आहोत.
याबाबत सरकार, पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याशी मी चर्चा केली. प्रत्येक लोकप्रतिधीनीने आपापल्या मतदारसंघात जमेल तशी जबाबदारी वाटून घेतली पाहिजे. सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने आपली वेळ जरी दिली तरी त्यांना आधार मिळेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.