अवर्गीकृत किल्ल्यांच्या पर्यटन योजनेबाबत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन


मुंबई : राज्यातील अवर्गीकृत किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच पर्यटकांना अनुभवजन्य पर्यटन करुन देण्यासाठी किल्ले पर्यटन योजना आखण्यात आली आहे. या योजनेबाबत लोकांनी सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन पर्यटन संचालक डॉ.धनंजय सावळकर यांनी केले आहे.

योजनेचा मसुदा पर्यटन संचालनालयाच्या www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासंदर्भातील सूचना व हरकती [email protected] या ईमेलवर ८ जुलै २०२१ पर्यंत पाठविण्यात याव्यात.

राज्यात ४०० पेक्षा अधिक किल्ले आहेत. यापैकी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत ४७ तर राज्य पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत ५१ किल्ले असून हे वर्गीकृत किल्ले आहेत. याशिवाय ३३७ अवर्गीकृत किल्ले आहेत. हे अवर्गीकृत किल्ले महसूल व वन विभागाच्या अखत्यारीत किंवा खाजगी मालकीचे आहेत. यापैकी खाजगी मालकीचे किल्ले वगळून उर्वरित अवर्गीकृत (महसुल व वन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या) किल्ल्यांच्या ठिकाणी पर्यटकांना मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे तसेच पर्यटकांना अनुभवजन्य पर्यटन उपलब्ध करुन देण्यासाठी किल्ले पर्यटन योजना आखण्यात आली आहे. या योजनेत किल्ल्यांच्या जतन व संवर्धनाची कामे प्रस्तावित नाहीत.

या योजनेतून किल्ल्यावर तसेच परिसरात देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, अनुभवजन्य पर्यटन, किल्ले पर्यटन योजनेची अंमलबजावणी यंत्रणा, योजनेचे प्रचलन, प्रचलनासाठी निवड होणाऱ्या संस्थेची कामे, निधी उपलब्धता, प्रचलनासाठी आर्थिक स्त्रोत, योजना राबविण्यासाठी किल्ल्यांची निवड करण्याकरीता समित्या, समित्यांच्या कार्यकक्षा आदी इत्यंभूत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासंदर्भात लोकांनी, या क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक आदींनी सूचना व हरकती पाठवाव्यात, असे आवाहन संचालक डॉ.सावळकर यांनी केले आहे.