
बार्सिलोना : स्पेनमधील तुरुंगात अमेरिकेच्या तंत्रज्ञान विश्वातील उद्योजक आणि अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरु तसेच McAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफी हे मृतावस्थेत आढळले होते. त्यांनी बार्सिलोनामधील एका तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली. नऊ महिने तुरुंगात राहिल्यामुळे ते निराश झाल्याची माहिती त्यांचे वकील झेवियर विलाब्ला यांनी दिली. नुकतीच जॉन मॅकॅफी यांच्या अमेरिकेला प्रत्यार्पण करण्याला स्पेनमधील हायकोर्टाने मंजुरी दिली होती.
स्पेनच्या जेलमध्ये मृतावस्थेत आढळले McAfee चे संस्थापक John McAfee
जगातील पहिले कमर्शिअल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ‘मॅकॅफी’ 75 वर्षीय जॉन मॅकॅफी यांनी बनवले होते. मला जर अमेरिकेत दोषी ठरवले तर संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालवावे लागेल, असे त्यांनी मागील महिन्यात कोर्टातील सुनावणीदरम्यान म्हटले होते. हा अन्याय स्पॅनिश कोर्टाला दिसेल, अशी मला आशा आहे. मला एका उदाहरणाप्रमाणे अमेरिका वापरु इच्छीतो, असे ते म्हणाले होते.
अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या प्राधिकरणांपासून जॉन मॅकॅफी पळ काढत आहेत. काही काळ ते आपल्या यॉटवरही राहिले. मॅकॅफी यांच्यावर करचोरीचा आरोप आहे. टेनेसी आणि क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मागील वर्षी 3 ऑक्टोबर रोजी जॉन मॅकॅफी यांना बार्सिलोना विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले होते. ब्रिटिश पासपोर्ट वापरुन ते इस्तांबूल जात होते.
जॉन मॅकॅफी यांनी NASA, Xerox आणि लॉकहीड मार्टिन यांसारख्या कंपन्यांसाठी काम केले होते. त्यांनी 1987 मध्ये जगातील पहिले कमर्शिअल अँटी-व्हायरस बनवले होते. जॉन यांनी 2011 मध्ये आपली सॉफ्टवेअर कंपनी इन्टेलला विकली होती आणि आता या व्यवसायात ते नव्हते. पण, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम आताही त्यांच्याच नावाने सुरु आहे. जगभरात सुमारे 50 कोटी यूजर या अँटी व्हायरसचा वापर करतात. जॉन मॅकॅफी यांनी 2019 मध्ये म्हटले होते की त्यांनी आठ वर्षांपासून अमेरिकेला वैचारिक कारणांमुळे आयकर दिलेला नाही.
