विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी ठाकरे सरकारला १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम


मुंबई – दि बा पाटील यांचे नाव नवी मुंबईतील विमानतळाला देण्याच्या मागणीने जोर धरला असून याच मागणीसाठी आज नवी मुंबईतील सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भुमिपूत्र तसेच प्रकल्पग्रस्तांनी गर्दी केली होती. दरम्यान सरकारला यावेळी विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. जर विमानतळाला १५ ऑगस्टपर्यंत दि बा पाटील यांचे नाव दिले नाही, तर १६ ऑगस्टपासून विमानतळाचे काम बंद पाडू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटलांचे नाव देण्यासाठी आज नवी मुंबईत आंदोलन करत सिडकोला घेराव घालण्यात आला. आंदोलन असल्यामुळे सकाळपासूनच पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात तैनात करण्यात आला होता. याशिवाय वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी वाहनांचे मार्गदेखील बदलण्यात आले होते. यावेळी नवी मुंबईतील आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सिडको भवनाकडे जात निवेदन दिले.

दम्यान एबीपी माझाला या संपूर्ण प्रकरणावर तसेच आंदोलनावर दि बा पाटील यांच्या कुटुंबियांनी प्रतिक्रिया दिली. हा संघर्ष बाळासाहेब ठाकरे किंवा दि बा पाटील यांचे नाव दिले जावे यासाठी आत्ता सुरु झाला आहे. विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देणे ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. त्यांनी कित्येक वर्ष प्रकल्पग्रस्तांसाठी मेहनत घेतली, जे काम केले ते सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना दि बा पाटील यांचे नाव दिले जावे, असं वाटत असून आमचीदेखील तीच इच्छा आणि आग्रह असल्याची प्रतिक्रिया त्यांच्या मुलाने दिली. ते पुढे म्हणाले की, आत्ता हा वाद सुरु झाला आहे. दि बा पाटील यांच्या नावाला विरोध करणारे नेते कित्येक वर्षांपासून त्यांचे नाव द्यावे यासाठी आग्रही होते. त्यामुळे हा वाद राजकीय आहे.

या आंदोलनात मनसेचे आमदार राजू पाटीलदेखील सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांना ही परिस्थिती टाळता आली असती. एकीकडे तुम्ही तिसरी लाट येणार सांगत असताना आम्हाला रस्त्यावर उतरायला का लावले? त्यांना जर फिकीर नसेल तर आम्हालाही नाही. आमच्या मागणीसह आम्ही रस्त्यावर आलो असल्याचे राजू पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान शिवरायांचे नाव असावे अशी राज ठाकरेंनी भूमिका घेण्यासंबंधी विचारण्यात आले असता राजू पाटील म्हणाले की, ते विमानतळ जर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तारीत भाग असेल तर त्याला तांत्रिक बाब म्हणून आपोआप शिवरायांचे नाव येणार आहे, ती काही आमची मागणी नाही. नवीन विमानतळ होणार असेल तर दि बा पाटील यांचेच नाव दिले जावे. आम्हाला संघर्ष करायचा नसून आमची ताकद दाखवायची असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोठा जनसमुदाय या मोर्चात उतरणार असण्याची शक्यता असल्याने बेलापूर परिसर सकाळी ८ पासून बंद ठेवण्यात आला होता. या परिसरात फक्त कार्यालयीन कामासाठी येणारे कर्मचारी, अधिकारी यांनाच प्रवेश देण्यात येत होता. तसेच अंतर्गत वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. या परिसरातून दररोज किमान १५ हजार लहान-मोठय़ा वाहनांची ये-जा होत असल्यामुळे वाहतूकीचे मार्ग वळविण्यात आले होते.