राजावाडी रूग्णालायातील प्रकारावरून प्रवीण दरेकरांची मुंबई महापालिकेवर संतप्त टीका


मुंबई – काल (मंगळवारी) घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाच्या डोळ्याला उंदराने चावा घेऊन जखमी केल्याची घटना समोर आली. ही घटना घडल्याचे रुग्णालय प्रशासनाने मान्य केले असून महापौरांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, आता यावरून भाजप नेते व विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी मुंबई महानगरपालिकेवर जोरदार टीका केली आहे.

उंदराने एका रुग्णाचे डोळे मुंबई महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात कुरतडले असल्याचा प्रकार धक्कादायक आहे, त्या रुग्णालयात जाऊन आज रुग्णाची विचारपूस केली. मुंबई महानगरपालिकेला शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना असल्याची टीका दरेकरांनी केली आहे.

तसेच, मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही, महापौरांना मुंबईकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही, येथे सगळेच ‘राम भरोसे’, राजावाडी रुग्णालयात उंदराने डोळा कुरतडलेल्या रुग्णाची भेट घेऊन विचारपूस केली. महापालिकेच्या माध्यमातून मुंबईला कुरतडणाऱ्या अशा ‘उंदरांचा’ लवकरच बंदोबस्त करावा लागणार असल्याचे देखील दरेकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


तसेच दरेकर रूग्णालयाबाहेर माध्यमांशी बोलाताना म्हणाले, डॉक्टरांनी आपल्यापरीने महापालिकेची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी १०० टक्के शरमने मान खाली मुंबईकरांना घालावी लागेल, किंबहुना महापालिकेला अशा प्रकारची भयानक गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे. असाच प्रकार सायन हॉस्पिटलमध्ये यापूर्वी देखील घडला होता.

महानगरपालिका जर कोरोनाकाळात सर्वोत्तम म्हणून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे आणि अशावेळी उंदीर जर एखाद्या आयसीयूमधील रूग्णाचे डोळे कुरतडत असेल, तर या पेक्षा गंभीर दुसरी बाब असू शकत नाही. मनपाच्या नियमांनुसार तिथे सॅनिटायझेशनची आवश्यकता असते, जर व्यवस्थित सॅनिटायझेशन झालेले असते, तर तिथे उंदीर येऊ शकला नसता. याचा अर्थ सॅनिटायझेशन करणारी यंत्रणा कमी पडली का? मग ते संबंधित अधिकारी कुठे आहेत? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे.

केवळ चौकशी झाली, अहवाल आला आणि तो बासनात गुंडाळून ठेवला, असा प्रकार होता कामा नये. लोक आता घाबरले आहेत, सायन हॉस्पिटलला या अगोदर असा प्रकार झालेला असुनही तुम्ही सुधारलात नाही. आता राजावाडी रूग्णालयात घडला आहे. येथील डॉक्टर्स देखील बाहेरचे असल्यामुळे या प्रकाराबद्दल मी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहे.

दरम्यान, पालिका रुग्णालयातील स्वच्छतेचा विषय या घटनेनंतर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर, या प्रकरणाची दखल महापौरांनी घेतली आहे. अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना केल्या जातील, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले आहे. रुग्णालयात घडलेला हा प्रकार गंभीर असून नेत्ररोग विभागाच्या डॉक्टरांनी रुग्णाची तपासणी केली आहे. डोळ्याला इजा झालेली नाही. रुग्णाच्या पापण्याखाली जखमा झाल्या आहेत. याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.