आरटीओ कथित भ्रष्टाचार प्रकरणी परिवहन मंत्री अनिल परबांना पोलिसांची क्लिन चीट


नाशिक : आरटीओमधील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी नाशिकमध्ये कोणताच गुन्हा घडला नसल्याचे पोलीस चौकशीतून निष्पन्न झाल्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 15 मे 2021 रोजी पंचवटी पोलीस ठाण्यात निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तक्रार अर्ज दाखल केला होता आणि त्यामध्ये त्यांनी आरटीओ विभागातील बदल्या, अधिकाऱ्यांच्या कामकाजातील अनियमितता, आर्थिक गैरव्यवहार या संदर्भात तक्रार केली होती. त्याचबरोबर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप केले होते.

निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर कथित आरटीओ भ्रष्टाचार प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरु केली होती. पोलिसांना या चौकशीत भ्रष्टाचार झाल्याचे आढळले नसल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिवहन मंत्री अनिल परब यांनाही क्लिन चीट देण्यात आली आहे. अशा प्रकारचा कोणताच गुन्हा नाशिकमध्ये घडला नसल्याचे पोलीस चौकशीतून स्पष्ट झाले आहे. ही चौकशी नाशिक क्राईम ब्रँचच्या माध्यमातून सुरु होती. तक्रारदारसह, वरिष्ठ अधिकारी आणि इतर अशा 30 हुन अधिकांचे जबाब याप्रकरणी नोंदवण्यात आले होते.

नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तक्रार केली होती. परंतु, त्यांची तक्रार ही केवळ नाशिकपुरतीच मर्यादित नसून ही संपूर्ण राज्यातील आरटीओच्या इतर विभागांमध्येही अशाच स्वरुपाचे गैरव्यवहार झाले, असल्याची त्यांची तक्रार होती. नाशिकमध्ये असा गुन्हा घडला नाही, परंतु, राज्यांतील इतर आरटीओ विभागांत काय घडले आहे? याचा संपूर्ण अहवाल नाशिक पोलिसांनी पोलीस महासंचालकांकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे नाशकात क्लिन चीट मिळाली, असली तरी राज्यांतील इतर विभागात काय घडले हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. पण तुर्तास तरी या प्रकरणी नाशकात काहीच घडले नसल्यामुळे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.