मराठमोळ्या दिग्दर्शकाच्या ‘सत्यनारायण की कथा’ चित्रपटात झळकणार कार्तिक आर्यन


मराठी चित्रपटसृष्टीमध्ये दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक म्हणजे समीर विद्वांस याने आजवर अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. समीर विद्वांस आता बॉलिवूडपटाचे दिग्दर्शन करणार आहे. अभिनेता कार्तिक आर्यनसोबत तो काम करणार आहे. समीरने या चित्रपटाची घोषणा सोशल मीडिया पोस्टद्वारे केली आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला समीर विद्वांसचा ‘सत्यनारायण की कथा’ हा चित्रपट येणार आहे. समीरने नुकतीच ट्विटरद्वारे या चित्रपटाची घोषणा केली आहे. एका नव्या प्रवासाला सुरुवात करत आहे. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असू द्या, असे समीरने ट्वीटमध्ये म्हटले आहे. तसेच समीरने चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर केले आहे.


या चित्रपटात बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस करणार असून चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहे. हा चित्रपट २०२२मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

समीरने यापूर्वी ‘धुरळा’, ‘डबल सीट’, ‘टाइम प्लीज’ आणि ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटांना मिळाला होता. आता लवकरच समीरची बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘समांतर २’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरले होते.

या सीरिजचा दुसरा सिझन आता १ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित, नीतिश भारद्वाज आणि सई ताम्हणकर दिसणार आहेत. ही १० भागांची सीरिज मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षकांना ही सीरिज एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे.