मंचर उपजिल्हा रुग्णालय २०० खाटांच्या श्रेणीवर्धनाला तत्वत: मान्यता


मुंबई :- पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर या आदिवासीबहुल तालुक्यांसाठी मध्यवर्ती असणाऱ्या मंचर उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांवरुन २०० खाटांचे श्रेणीवर्धन करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वत: मान्यता दिली.

मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील उप जिल्हा रुग्णालयाच्या खाटांच्या श्रेणीवर्धनाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुके हे आदिवासी बहुल आणि दुर्गम तालुके आहेत. या तिन्ही तालुक्यातून पुणे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण दूर आहे. याचा विचार करुन या तिन्ही तालुक्यांसाठी मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या मंचर, ता. आंबेगाव येथील उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर खाटांवरून दोनशे खाटांचे श्रेणीवर्धन प्रस्तावाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तत्वत: मान्यता दिली. या उपजिल्हा रुग्णालयातील खाटांची संख्या वाढल्याने आदिवासी बांधवांसह या भागातील सामान्य जनतेची मोठी सोय होणार आहे.