महाराष्ट्रात डेल्टा प्लसचा अद्याप फैलाव नाही, पण त्याचे गुणधर्म गंभीर – राजेश टोपे


मुंबई – नुकताच कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा समावेश केंद्र सरकारने Variant of Concern या श्रेणीमध्ये केला आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात सापडणारे डेल्टा प्लसचे रुग्ण हा केंद्रीय आरोग्य विभागासाठी काळजीचा विषय ठरले आहे. आत्तापर्यंत देशभरात जवळपास ४० कोरोनाबाधितांमध्ये डेल्टा प्लस हा कोरोनाचा नवीन प्रकार आढळला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील २१ रुग्णांचा समावेश असल्यामुळे महाराष्ट्रासह केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना केंद्राने सतर्कतेचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या पार्श्वभूमीवर राज्यात डेल्टा प्लसचा सामना करण्यासाठी कोणत्या प्रकारची काळजी घेतली जात आहे, याविषयी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचे २१ रुग्ण असल्याची माहिती दिली. मात्र, त्याचवेळी हा एवढ्या गंभीर पातळीवर वाढला नसल्याचे सांगितले. आपण प्रत्येक जिल्ह्यातून दर आठवड्याला काही नमुने प्रयोगशाळांना पाठवतो आहोत. आत्तापर्यंत ३४०० नमुन्यांपैकी २१ केसेसमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट सापडला आहे. त्याचे प्रमाण ०.००५ असे सापडल्यामुळे डेल्टा प्लस व्हेरियंट अजून एवढ्या गंभीर पातळीवर वाढलेला नाही. काळजीचा विषय नसला, तरी त्याचे गुणधर्म मात्र गंभीर आहेत. त्यासाठी या सर्व २१ केसेसचे विलगीकरण आपण करत असून त्यांचे निरीक्षण केले जात आहे. त्यांच्या बाबतीत काँटॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंग सविस्तरपणे सुरू असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दरम्यान, डेल्टा प्लसच्या कोणत्या गुणधर्मांमुळे तो डेल्टापेक्षा जास्त धोकादायक आहे, याविषयी देखील राजेश टोपे यांनी सविस्तर माहिती दिली. डेल्टा प्लस व्हेरियंट राज्यात जवळपास ७ जिल्ह्यांमध्ये सापडला आहे. महाराष्ट्रात त्याची एकूण रुग्णसंख्या २१ इतकी आहे. आता डेल्टा प्लस काळजीचं कारण झाला आहे. याचा अर्थ त्याचा फैलाव होण्याचा वेग, संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्याचा धोका देखील जास्त असू शकतो. त्याशिवाय शरीरातील अँटिबॉडीजचा प्रभाव कमी करण्याचा गुणधर्म डेल्टा प्लस व्हेरियंटमध्ये पाहायला मिळत असल्याचे ते म्हणाले. तसेच, डेल्टा प्लसचा अभ्यास सुरू आहे. सुदैवाने डेल्टा प्लसमुळे एकही मृत्यू झालेला नाही. केंद्राला ही माहिती पाठवण्याची कार्यवाही करत असल्याचे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.