चीनच्या या निर्णयामुळे बीटकॉईनच्या किंमतीत मोठी घसरण


नवी दिल्ली : एकेकाळी विक्रमी 50 लाखांवर गेलेली एका बीटकॉईनची किंमत आता 22 लाखांवर आली आहे. गेल्या पाच महिन्यातील बीटकॉईनची ही किंमत निचांकी पातळीवर असून यात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ताज्या माहितीनुसार, 29,511 डॉलरवर एक बिटकाईनची किंमत पोहोचली असून 22 जानेवारीनंतर पहिल्यांदाच 30 हजार डॉलरच्या आत म्हणजे जवळपास 22 लाखांवर आली आहे. आपल्या देशातील क्रिप्टोकरंसीबाबतच्या नियमांत चीनने बदल केल्याने बीटकॉईनची किंमत घसरली आहे.

आपल्या क्रिप्टोकरंसीच्या नियमांत चीनने बदल करुन क्रिप्टोकरंसी मायनिंगच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. बीटकॉईनच्या किंमतीवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. क्रिप्टोकरंसीचे ट्रेडिंग आणि मायनिंगसाठी चीन ही सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचे सांगितले जाते. क्रिप्टोकरंसीच्या धोरणात चीनने बदल केल्यामुळे त्याचा फटका बीटकॉईनला बसला आहे.

आता जगभरातील क्रिप्टोकरंसीच्या व्यवहारांवर याचा परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नेहमी काही ना काही वेगळी धोरणे राबवून जगाच्या अर्थव्यवस्थेला चीन वेठीस धरतो, अशी तक्रार अनेक देश करतात. आता क्रिप्टोकरंसीचे बदललेले धोरण हा त्याचाच भाग असल्याचे सांगण्यात येत आहे.

बीटकॉईनचे सुरुवातीला समर्थन करणाऱ्या टेस्लाच्या एलन मस्क यांनीही गेल्या महिन्यात आपण बीटकॉईन वापरणार नसल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता बीटकॉईनचा वापर टेस्लाच्या कार खरेदीसाठी करता येणार नाही. टेस्लाने आपल्या कार खरेदीसाठी बीटकॉईनचा पर्याय दिला होता.

आता हा निर्णय कंपनीने मागे घेतला असून तशा प्रकारची घोषणा सीईओ एलन मस्क यांनी केली आहे. क्रिप्टोकरन्सी ही अनेक स्तरावर वापर करण्याजोगी चांगली कल्पना आहे, पण पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत मोजून त्याचा वापर आपण करत नसल्याचे एलन मस्क यांनी सांगितले. एलन मस्क यांच्या बीटकॉईन न स्वीकारण्याच्या या निर्णयानंतर बीटकॉईनच्या किंमती 17 टक्क्यांनी घसरल्या होत्या.