या देशांनी भारतीय पर्यटकांसाठी खोलले दरवाजे

करोना लॉकडाऊन मुळे गेले दीड वर्ष घरात जखडून पडलेल्या भटक्यांना आत्ता अनेक देशात अनलॉक प्रक्रिया सुरु झाल्याने भटकंतीचे वेध लागले आहेत. भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने खुपच कहर केल्याने अनेक देशांनी भारतीयांना त्यांच्या देशांचे दरवाजे बंद केले होते. मात्र आता काही देशांनी भारतीय पर्यटकांसाठी देशाचे दरवाजे खुले केले आहेत. त्यामुळे परदेशात जाण्यास इच्छुक पर्यटक या संधीचा फायदा घेऊ शकणार आहेत.

रशियाने भारतीय पर्यटकांना देश प्रवेशास परवानगी दिली असून तेथील काही टूर ऑपरेटर्स हॉलीडे पॅकेज घेऊन आले आहेत. रशियातील स्थळदर्शन करण्याबरोबर लसीकरण करून घेण्याची सुविधा येथे दिली जात आहे. अर्थात या प्रवासासाठी जाताना ७२ तासापूर्वी केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा करोना निगेटिव्ह रिपोर्ट बरोबर न्यायला हवा. मास्को मध्ये अजून लॉकडाऊन आहे. येथे जायचे असल्यास घरी, हॉटेल मध्ये सात दिवस सेल्फ आयसोलेशन मध्ये राहावे लागले असे समजते.

मॉरिशस हा भारताचा एक भाग असावा असा सुंदर देश. अनेक भारतीयांना आवर्जून या देशाला भेट देण्याची इच्छा असते. येथे १५ जुलै पासून आंतरराष्ट्रीय पर्यटन खुले केले जात आहे. मात्र येथे प्रवेशाचे काही टप्पे ठरविले गेले आहेत. त्यानुसार १५ जुलै ते ३० सप्टेंबर या काळात करोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले पर्यटक येऊ शकणार आहेत. येथेही आरटीपीसीआर निगेटिव्ह प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

सर्बिया मध्येही पर्यटकांना दारे खुली केली आहेत. ४८ तासापूर्वीच आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट त्यासाठी द्यावा लागले. १२ वर्षाखालील मुलांना हा नियम लागू नाही. राजधानी बेलग्रेड येथे जाण्यासाठी सध्या कमी प्रमाणात फ्लाईट आहेत त्यामुळे अगोदर पासून बुकिंग करून जाणे चांगले.

इजिप्तला जाणार असला तर तेथे पोहोचल्यावर तुमची करोना तपासणी केली जाणार असून स्वास्थ्य घोषणा प्रमाणपत्र भरणे बंधनकारक आहे. १५ ऑगस्ट पासून इजिप्तला भेट देणे शक्य होणार आहे मात्र येथेही ७२ तास अगोदर केलेल्या आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी रिपोर्ट द्यावा लागेल. अफगाणिस्थानला जायचे असेल तर तुमच्याकडे कोणताही वैध व्हिसा असेल तर आरटीपीसीआरचा रिपोर्ट नसला तरी चालणार आहे. मात्र देशात गेल्यावर १४ दिवस सेल्फ आयसोलेशन मध्ये राहावे लागेल असे समजते.