सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण वर्गासाठी ३० जूनपर्यंत प्रवेश


मुंबई : वर्सोवा येथील मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्रात सहा महिने कालावधीतील सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन प्रशिक्षण सत्रास 1 जुलैपासून सुरूवात होणार असून या सत्रातील प्रवेशासाठीची अंतिम तारीख वाढवून आता 30 जूनपर्यंत अर्ज करता येणार असल्याचे प्रशिक्षण केंद्राच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.

मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोनातून, मत्स्यव्यवसायातील इच्छूक प्रशिक्षणार्थीना वर्सोवा येथील मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण देण्यात येते. त्या अनुषंगाने सन 2021-2022 या चालू वर्षातील, दिनांक 01 जुलै 2021 ते दिनांक 31 डिसेंबर 2021 या सहा महिन्याच्या कालावधीचे प्रशिक्षण सुरू होणार आहे.

यासाठी, प्रति प्रशिक्षणार्थी दरमहा प्रशिक्षण शुल्क रूपये 450/- तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा रूपये 100/- एवढे आहे. या प्रशिक्षणासाठी इच्छुक मच्छिमारांनी विहीत अर्ज आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडूरंग रामले मार्ग, तेरे गल्ली,वर्सोवा, मुंबई – 61 येथे दिनांक 30 जून 2021 पर्यत सादर करावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.