मुलाला महागडी कार गिफ्ट केल्याच्या वृत्तावर सोनूने दिले स्पष्टीकरण


अभिनेता सोनू सूद कोरोना काळात लोकांना मदत करून गरिबांचा ‘देवदूत’ बनला आहे. आतापर्यंत तो कोरोना काळात करत असलेल्या त्याच्या कामांवर चर्चा सुरू होत्या. पण तो गेल्या एक दिवसापासून वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला. सोनू सूदचा मुलगा ईशान नुकताच १८ वर्षांचा झाला असून अभिनेता सोनू सूदने फादर्स डे च्या एक दिवस आधी आपल्या मुलाला तब्बल ३ कोटी रूपयाची महागडी आणि लक्झरी कार कार गिफ्ट केली. सध्या सोशल मीडियावर याचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता सोनू सूदने यावर मौन सोडत मुलासाठी कोणतीच कार घेतली नसल्याचे त्याने सांगितले आहे.

स्वतः पुढे येत मुलासाठी ३ कोटीची महागडी कार घेतल्याच्या अफवांचे सोनू सूदने खंडन केले आहे. त्याने यावेळी सांगितले की, या वृत्तात कोणतही तथ्य नाही. माझ्या मुलासाठी मी कोणतीच कार घेतलेली नाही. व्हिडीओमध्ये दिसत असलेली कार आमच्या घरी ट्रायलसाठी आली होती आणि टेस्ट ड्राईव्हसाठी आम्ही गेलो होतो. पण आम्ही कोणतीच कार खरेदी केली नाही. पुढे सोनू सूद म्हणाला, यात फादर्स डेचा अ‍ॅंगल कुठून आला ते मला माहित नाही. मी माझ्या मुलाला फादर्स डेच्या दिवशी गिफ्ट का देणार ? याउलट त्यांनी मला काही तरी गिफ्ट केले पाहिजे. शेवटी आज माझा दिवस आहे.

सोनू सूद यावेळी म्हणाला, माझ्यासोबत माझी दोन्ही मुले संपूर्ण दिवस घालवतील तेच माझ्यासाठी फादर्स डेचे गिफ्ट होईल. कारण त्या दोघांसाठी माझ्याकडे खूप कमी वेळ असतो. आता ते दोघेही मोठे होत आहेत. त्यांचेही आता वेगळे जीवन सुरू होईल. त्यामुळे सोबत एकत्र दिवस घालवला तरी ते काही लक्झरीपेक्षा काही कमी ठरणार नाही. जे मला हवे आहे ते मी कमवले आहे.

सोनूने मुलाला महागडी कार गिफ्ट केल्याच्या वृत्तावर फॅन्स ज्या प्रकारे व्यक्त झाले, त्याबद्दल त्याने फॅन्सचे आभार मानले आहेत. तो यावेळी म्हणाला, या वृत्तावर ९० पेक्षा लोकांचे कमेंट्स हे माझ्या बाजूने होते. जी सकारात्मकता आणि प्रेम मला गेल्या एक महिन्यापासून मिळत आहे, त्यासाठी सर्वांचा मी आभारी आहे. हेच जीवनातील सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे. मग किती तरी जणांनी माझ्या कामाप्रती लोकांच्या मनातील विचारांना बदलण्याचा प्रयत्न केला तरी माझे शुभचिंतक कधीच माझ्यावर शंका घेणार नाहीत.