सरकार पाच वर्ष टीकणार, संजय राऊतांना विश्वास


मुंबई – राज्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ माजली आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे भाजपशी पुन्हा युती करावी, अशी मागणी केली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे ठरवले असून शिवसेनेचेच नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस फोडत असल्यामुळे आता भाजपशी जुळवून घ्यावे, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी यावेळी काही गंभीर आरोपही केले आहेत. दरम्यान यामुळे शिवसेनेत गटबाजी असल्याची चर्चा सुरु असल्याच्या प्रश्नावर मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

संजय राऊत यांना शिवसेनेत दोन गट आहेत का असे विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, आमच्या पक्षात कोणतेही गट नाहीत. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे हा एकमेव गट आहे. उद्धव ठाकरे प्रमुख आहेत आणि आम्ही सर्व त्यांच्या नेतृत्वात काम करत आहोत. आमच्याकडे अजून तो आजार आलेला नाही.

आपापल्या पक्षाचा प्रत्येकजण विस्तार करत असतो. आम्ही देखील करत असून राष्ट्रवादी आणि काँग्रेसही करेल. कोणी कशा पद्धतीने लढायचे यावर कोणतीही चर्चा झालेली नसून ती योग्य वेळी होईल. सरकार पाच वर्ष चालवायचे यासाठी तिन्ही पक्षांची बांधिलकी आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, बाळासाहेब थोरात, नाना पटोले आणि दिल्लीतील नेतेही नेहमी किमान समान कार्यक्रम सरकार चालवण्याचा मुख्य आधार असल्याचे सांगत असतात, असे संजय राऊत यांनी यावेळी सांगितले.

आम्ही सर्वजण मुख्यमंत्र्यांसोबत आहोत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकमेकांसोबत मजबुतीने उभे आहोत. सत्ता गेल्यामुळे ज्यांच्या पोटात दुखत आहे, त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी सरकार पाच वर्ष चालणार, कितीही फूट पाडण्याचा प्रयत्न केला तरी यश मिळणार नाही. महाविकास आघाडीमध्ये असणारा समन्वय देशाच्या राजकारणात आदर्श आहे. आघाडीचे सरकार कसे चालवावे, त्याचा उत्तम फॉर्म्यूला महाराष्ट्रात असल्याचे सांगत संजय राऊत यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला.

शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची कामे होत असून शिवसेनेच्या आमदारांची होत नसल्याचा आरोप प्रताप सरनाईक यांनी केला आहे. यासंबंधी विचारण्यात आले असता संजय राऊत यांनी सांगितले की, सरकारमध्ये मी नसल्यामुळे त्याविषयी बोलू शकत नाही. पण ते शिवसेनेचे सन्माननीय सदस्य आणि आमदार आहेत. ते आणि त्यांचे कुटुंब त्रासात, अडचणीत आहे. त्यांनी पत्रात अडचणींचे कारण सांगितले आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन भाजप विनाकारण त्रास देत असल्याचे त्यांना म्हटले आहे. त्या त्रासातून सुटका करुन घेण्यासाठी मोदींशी जुळवून घ्यावे, असे त्यांनी सांगितले आहे. ते त्यांचे मत आहे. पण पक्षाची भूमिका उद्धव ठाकरेंनी सर्वाशी बोलून घेतली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे असून विनाकारण होणाऱ्या त्रासाचा सामना कसा करावा यासाठी संपूर्ण पक्ष प्रताप सरनाईक त्यांच्या पाठीशी आहे.

प्रताप सरनाईक हे आमदार आणि शिवसेनेच्या कुटुंबाचे सदस्य आहेत. ते आणि त्यांचे कुटुंब त्रासात असून त्यांच्या मागे ज्याप्रकारे केंद्रीय यंत्रणांना लावण्यात आले आहे, ते पाहता असे संकट कोणावरही येता कामा नये. पण या संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ठाकरे कुटुंब, शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. गरज लागेल ती मदत केली जाईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या लोकांनी तसेच महाराष्ट्रानेही विनाकारण दिलेला त्रास काय असतो हे अनुभवले आहे. सत्ता गेली, जात आहे किंवा मिळत नाही म्हणून विनाकारण त्रास देत भारताच्या संस्कृतीला शोभत नाही आणि महाराष्ट्राला तर अजिबात नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.

शिवसेना नेत्यांवर दबाव टाकून सत्तास्थापनेसाठी भाग पाडण्याचा प्रयत्न आहे का ? असं विचारण्यात आले असता ते म्हणाले की, त्यांना यश मिळेल, असे वाटत नाही. आम्ही वाघाच्या काळजाची माणसे आहोत. आमचे शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचे यात मोडत नाही. आम्ही कोणत्याही प्रसंगाला तोंड देणारे बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. शिवसेनेसोबत काम करता करता केस पांढरे झाले आहेत आणि परत काळे करत आहोत. आम्हाला सर्व माहिती असून फार तर तुरुंगात टाकाल. तुरुंगात जाण्याची आमची तयारी आहे. आम्ही महाभारताची जी उदाहरणे जी दिली आहेत, त्यातील योद्धे आम्हीच आहोत आणि माझे नाव तर संजय आहे. संजय राऊतांना यावेळी योग दिनाच्या निमित्ताने कोणते आसन सुचवाल असे विचारले असता शवासन असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे भाजपशी पुन्हा युती करावी, अशी मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. काँग्रेसने स्वबळावर निवडणुका लढविणार असल्याचे ठरविले असून राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचेच नेते व कार्यकर्ते फोडत असल्यामुळे आता भाजपशी जुळवून घ्यावे, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले आहे.

कोरोना काळात मुख्यमंत्री ठाकरे यांनी खंबीरपणे समर्थ नेतृत्व गेले दीड वर्षे केले आहे. मुख्यमंत्री राजकारण बाजूला ठेवून काम करत आहेत. पण शिवसेनेला मुख्यमंत्रीपद काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमुळे मिळाले, असे त्यांना वाटत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री, नेते व सनदी अधिकारी हे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा टाळण्यासाठी छुपी हातमिळवणी करत आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची कामे होत असून शिवसेनेच्या आमदारांची होत नाहीत. त्याबद्दल शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याकडे सरनाईक यांनी लक्ष वेधले आहे.

मला, अनिल परब, रवींद्र वायकर आदींना व त्यांच्या कुटुंबियांना गेले काही महिने केंद्रीय तपास यंत्रणा आणि काही भाजप नेत्यांमुळे कमालीचा त्रास होत असून बदनामीही होत आहे. त्यांनी या पत्रात भाजपचा माजी खासदार तपास यंत्रणांचा दलाल म्हणून काम करीत असल्याचे नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपण नुकतीच भेट घेऊन खासगीत चर्चाही केली आहे. पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. भाजप नेत्यांशी आपले जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते अधिक तुटण्यापेक्षा पंतप्रधान मोदींशी व भाजपशी जुळवून घेतल्यास त्याचा माझ्यासह अन्य नेत्यांना आणि शिवसेनेलाही भविष्यात लाभच होईल, असे सरनाईक यांनी पत्रात म्हटले आहे.