मैत्री करताना..


एखाद्या व्यक्तीशी आपली मैत्री पटकन होते खरी, पण जसजसा काळ सरत जातो, तसतशी त्या व्यक्तीची स्वभाववैशिष्ट्ये आपल्या लक्षात येऊ लागतात. त्यातूनच आपल्या सहवासामध्ये असलेल्या अनेक मित्र-मैत्रिणींचा आपल्या आयुष्यावर आपल्या कळत नकळत सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो. त्यामुळे कोणाशी मैत्री करताना त्यांची स्वभाववैशिष्ट्ये नकारात्मक असतील, तर त्या मैत्रीचा नकारात्मक प्रभाव आपल्याही मनःस्थितीवर पडत असतो.

काही व्यक्तींचे जग केवळ स्वतःपुरते मर्यादित असते. त्यामध्ये इतरांची मते, इतरांच्या आवडी-निवडी, सोयी-गैरसोयी या कशाचीच पर्वा त्यांना नसते. सर्व काही त्यांना स्वतःच्या मनाप्रमाणे झालेले आवडते. एखादी लहानशी गोष्ट जरी त्यांच्या मनाविरुद्ध झाली, तरी त्या गोष्टीचा बाऊ करण्याची सवय या व्यक्तींना असते. अशा व्यक्तींना इतरांची मते ऐकून घेणे, किंवा इतर कोणी कितीही चांगले सल्ले दिले तरी ते पटवून घेणे अवघड जाते. या व्यक्ती स्वभावाने वाईट असतात असे नाही, पण एक मित्र म्हणून मात्र यांचा प्रभाव नक्कीच नकारात्मक ठरू शकतो.

अनेक व्यक्तींना सतत तक्रार करीत राहण्याची सवय असते. अशा व्यक्ती सतत इतर व्यक्तींमध्ये आणि त्याच्या आसपासच्या गोष्टींमध्ये, घटनांमध्ये सतत उणीवा शोधत राहतात. अशा व्यक्ती क्वचितच आनंदी राहू शकतात. कुठलीही गोष्ट कितीही चांगली असली, तरी या व्यक्तींची त्या गोष्टीबद्दल तक्रार कायम असते. अशा व्यक्ती इतरांना प्रोत्साहन देण्याच्या ऐवजी सतत त्यांच्या चुका दाखवून देत इतरांचा हिरमोड करीत असतात. अशा व्यक्ती सकारात्मक मित्र ठरू शकत नाहीत. इतर लोक सतत आपली उपेक्षा करतात ही भावना या लोकांच्या मनामध्ये कायम असते. त्यामुळे स्वतःच्या आयुष्याच्या बाबतीतही या व्यक्तींचा नेहमीच तक्रारीचा सूर असतो. असा व्यक्तींशी मैत्री केल्याने त्यांच्या सततच्या तक्रारी करण्याच्या आणि सर्व गोष्टींमध्ये उणीवा शोधण्याच्या स्वभावाचे परिणाम नक्कीच नकारात्मक होतात.

Leave a Comment